मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट! ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह जंगलात लपवला; जळगाव पोलिसांनी ३५ दिवसांनी केली उकल

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट! ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह जंगलात लपवला; जळगाव पोलिसांनी ३५ दिवसांनी केली उक

जळगाव : पारोळा तालुक्यातील करंजी येथील ८५ वर्षीय वृद्ध महिला वैजयंती गणपत माळी यांच्या खून प्रकरणाचा जळगाव पोलिसांनी तब्बल ३५ दिवसांनी उलगडा केला आहे. स्वतःची अपत्ये नसल्याने मुलाप्रमाणे मानलेल्या सख्ख्या बहिणीच्या मुलानेच त्यांचा घातक कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी असे संशयित आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला १२ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे येथून ताब्यात घेतले.

वैजयंती गणपत माळी, वय ८५ वर्षे, रा. करंजी, ता. पारोळा या आपल्या घरातून ३ ऑगस्ट २०२६ रोजी बेपत्ता झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यानंतर १९ ऑगस्ट २०२६ रोजी अपहरणाचा गुन्हा कलम १३८(२) बीएनएस अन्वये गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, वैजयंती माळी यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर त्यांचा सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी हादेखील अचानक गायब झाल्याचे काही दिवसांनी पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा संशय प्रशांतच्या हालचालींकडे वळला.

मुलाप्रमाणे मानलेल्या भाच्यावरच संशय

वैजयंती माळी यांना स्वतःची अपत्ये नसल्याने त्या प्रशांतला मुलाप्रमाणे मानत होत्या. त्या वेळोवेळी प्रशांतला आर्थिक मदतही करीत असल्याची माहिती तपासात समोर आली. मात्र, प्रशांतवर एचडीएफसीचे कर्ज तसेच इतर उधाऱ्या असल्याने वैजयंती माळी यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर त्याची नजर असल्याचा संशय तपासादरम्यान पुढे आला.

CCTV फुटेजने तपासाला मिळाली महत्त्वाची दिशा

पोलिसांनी करंजी परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता प्रशांत हा करंजी गावात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तसेच एका CCTV फुटेजमध्ये वैजयंती माळी या घाईघाईने जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसून आल्या. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रशांतचा कसून शोध सुरू केला.

तब्बल ३५ दिवस फरार राहिल्यानंतर जळगाव पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे प्रशांतचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर १२ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत खुनाची धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांतने वैजयंती माळी यांना खोटी माहिती देऊन विश्वासात घेतल्याचे समोर आले. आपल्या साडूच्या वडिलांचे निधन झाले असून, अंत्यविधीसाठी शिरसोली येथे घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे त्याने वैजयंती यांना सांगितले.

यानंतर त्याने वैजयंती यांच्याकडे दागिने मागितले. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यात वैजयंती माळी निपचित पडून राहिल्या. त्यानंतर प्रशांतने मुकटी, धुळेपासून सुमारे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर त्यांच्या गळ्याला कापडाने आवळून त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

खून केल्यानंतर त्याने वैजयंती यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर रात्रीच्या वेळी मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून तो मुकटी येथील घरी गेला आणि तेथे झोपला.

सकाळी उठल्यानंतर दिवसभर मृतदेह कुठे फेकायचा याचा विचार करत तो फिरत राहिला. दरम्यान, त्याने दुपारी एका सोनाराकडे वैजयंती यांच्या दागिन्यांची विक्री केली. त्यानंतर रात्रीच्या वेळी बायपास हायवेवरील ड्रेनेज पट्टीच्या सिमेंटमधील एका गॅपमध्ये मृतदेह फेकून दिल्याची माहिती चौकशीत समोर आली.

पोलिसांनी शोधला मृतदेह

१३ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत माळी याने दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाचा शोध घेतला. त्यावेळी संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष तसेच सांगाडा आढळून आला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुलाप्रमाणे मानलेल्या भाच्यानेच वृद्धेचा घात केल्याने या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे.

जळगाव पोलिसांच्या तपासाचे कौतुक

या गुन्ह्याचा तपास करताना जळगाव पोलिसांनी दाखवलेले धैर्य, चिकाटी, मानवी गुप्तवार्तेचा प्रभावी वापर, सातत्यपूर्ण तपास, CCTV फुटेजचे विश्लेषण, तपासातील कौशल्य आणि घेतलेले अथक परिश्रम यांच्या आधारे अखेर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *