आधुनिक शेतीचे ‘पॉवर हाऊस’ म्हणजे ‘फाली’; जैन हिल्सवर १२ व्या वार्षिक अधिवेशनाचा दिमाखात प्रारंभ

आधुनिक शेतीचे ‘पॉवर हाऊस’ म्हणजे ‘फाली’; जैन हिल्सवर १२ व्या वार्षिक अधिवेशनाचा दिमाखात प्रारं

​तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीतील नकारात्मकता बदलणे शक्य: उद्योजक आणि शेतकऱ्यांचा सूर

​देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभवली हायड्रोपोनिक्स आणि टिश्यूकल्चरची किमया

​जळगाव, ७ जून:

हवामान बदल आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे आज शेती क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना करत आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीतील ही नकारात्मकता नक्कीच दूर होऊ शकते. गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये झालेले क्रांतिकारक बदल हे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. यातच मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणारी ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ही संस्था आधुनिक कृषी क्षेत्राचे ‘पॉवर हाऊस’ म्हणून पुढे येत आहे, असा विश्वास कृषी उद्योजक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

​स्थानिक जैन हिल्स येथे आयोजित ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI-12) च्या १२ व्या वार्षिक अधिवेशनातील अंतिम टप्प्याची सुरुवात आज उत्साहात झाली, त्याप्रसंगी आयोजित संवादात हा सूर उमटला.

​शिवार फेरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव

​अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी जैन हिल्सवरील विविध प्रकल्पांना भेटी देऊन आधुनिक शेतीचे धडे गिरवले. ‘शिवार फेरी’ दरम्यान विद्यार्थ्यांनी जैन हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी आणि टिश्यूकल्चर लॅबला भेट देऊन रोपांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच, जैन फार्मफ्रेश फूड्सच्या कांदा निर्जलीकरण (Dehydration) प्रकल्प आणि आंबा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन कृषी प्रक्रिया उद्योगाची साखळी समजून घेतली.

​याशिवाय, भविष्यातील मातीविना केली जाणारी शेती म्हणजेच ‘फ्यूचर फार्मिंग’ आणि ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यानंतर विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘खोज गांधीजी की’ या ऑडिओ गाईडेड संग्रहालयाला भेट देऊन महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले.

​शेतकरी आणि उद्योजकांसोबत रंगली ‘गट चर्चा’

​जैन हिल्सच्या ‘परिश्रम’ आणि ‘आकाश ग्राऊंड’वर शेतकरी, उद्योजक आणि फालीच्या विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वपूर्ण गट चर्चा रंगली. या चर्चेत कार्बन क्रेडिट शेती, शेतीमधील महिलांचे योगदान, ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर, टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून निर्यातक्षम उत्पादन, प्रक्रिया उद्योगवाढीसाठी लागणारे घटक, पोल्ट्री उद्योग तसेच शेतीमधील ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर यांवर सविस्तर मंथन झाले. उत्पादन प्रक्रियेपासून ते ट्रेडिंगपर्यंतच्या संपूर्ण साखळीवर आणि नवनवीन कृषी उद्योजकीय कल्पनांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

​प्रश्नोत्तरातून समजले शेतीचे बारकावे

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना अनुभवी शेतकऱ्यांनी शेतीमधील बारकावे, रोजची आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

​दिग्गजांची उपस्थिती

​या नाविन्यपूर्ण सत्रात शेतकरी नारायण पाचपांडे, उमाकांत भारंबे, सागर पाटील, पंकज घाटे, भागवत बाजीराव पाटील, विशाल पाटील, क्रिष्णा पाटील यांनी आपले अनुभव मांडले. तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून गौरी त्रिपाठी, श्रृती चौहान, सिद्धी गावकर, शिवा देवसाकर, सेजल पाटील, प्राजक्ता भार्गव यांच्यासह विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

​आकाश ग्राऊंड येथील शेतकरी संवादाचे सूत्रसंचालन जुली पटेल यांनी केले, तर परिश्रम हॉलमधील गट चर्चेचे समन्वयन शाबोर्नी पोद्दार यांनी यशस्वीरी्या सांभाळले.

​फोटो कॅप्शन: परिश्रम हॉलमध्ये आयोजित गट चर्चेत कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर संवाद साधताना ‘फाली’चे विद्यार्थी, शेतकरी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *