कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हा, सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे
जळगाव धनगर समाज महासंघातर्फे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जळगाव : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी. मोबाईलच्या क्षणिक आकर्षणाला बळी न पडता त्याचा गरजेपुरताच वापर करावा. संत-महापुरुषांचे विचार आत्मसात करून उच्च शिक्षण घेत मोठ्या पदावर पोहोचावे आणि समाजाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केले.
जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना आणि सांस्कृतिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. भोळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना बोरसे होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर दीपमाला काळे, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सुभाष सोनवणे, दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, योगेश सोनवणे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे, सुभाष करे, शतायु हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोपाल घोलप, संदिप तेले, रमेश सुलताने, दिलीप धनगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, दशरथ नाना लांडगे, गणेश जाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांनी कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भविष्यातही यश संपादन करावे, असे सांगितले. समाजाने आपल्यासाठी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून समाजहितासाठी योगदान देण्याची भावना विद्यार्थ्यांनी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे सांगितले. तसेच संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या व्यक्तींचे ऋण सदैव लक्षात ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना बोरसे यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून काही प्रमाणात दूर राहून शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. पालकांनीही लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजकार्याला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसोबतच स्पर्धा परीक्षा, क्रीडा, उद्योग, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांत पुढे यावे, तसेच समाजाच्या संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.
२०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट, जेईई तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध वर्गांतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र नक्षत्र एनर्जी सोल्युशनच्या संचालिका मनीषा योगेश सोनवणे यांच्या माध्यमातून देण्यात आले. कर्मयोगिनी प्रगती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुलताने व विजय शिरसाठ यांच्या माध्यमातून जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले, तर तुळशीराम सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे, अरुण ठाकरे, तुळशीराम सोनवणे, सुभाष खोमणे, महिंद्र सोनवणे, प्रवीण पवार, दीपक धनगर, डॉ. संजय पाटील, यशवंत शिरोळे, शरद न्हाळदे, अनिल मनोरे, पांडुरंग पवार, भरत न्हाळदे, मयुर ठाकरे, हर्षल पवार, विलास न्हाळदे यांनी परिश्रम घेतले.
