“नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; २३ दिवसांत ५ बळींनंतर अखेर गंभीर गुन्हा दाखल!”

जळगाव | प्रतिनिधी

पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर जळगाव शहरातून वाढलेल्या अवजड वाहतुकीमुळे अवघ्या २३ दिवसांत पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न सातत्याने लावून धरणारे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदने, लेखी तक्रारी आणि इशारे देत संभाव्य धोका निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे गुन्हा दाखल होणे हा त्यांच्या पाठपुराव्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

उपलब्ध फिर्यादीच्या माहितीनुसार, ‘अँग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे एम.डी. शैलेंद्र सिंघल, कंपनीचे जी.एम. दत्ता आणि संबंधित साइट अधिकारी, अशा एकूण तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुखांनी आधीच दिला होता धोक्याचा इशारा

बायपास बंद झाल्यानंतर अवजड वाहतूक शहरातून वळविण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढणार असल्याचे अरविंद देशमुख यांनी सुरुवातीपासूनच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. ८ ऑगस्ट रोजी NHAI प्रशासनाला पत्र देत पाळधी–तरसोद बायपासची किमान एक मार्गिका दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.

तसेच रोड सेफ्टी ऑडिट, महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती, रिफ्लेक्टर, रम्बलर्स, दिशादर्शक व धोक्याचे फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचे सुरक्षित नियमन करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

“पाचव्या बळीची वाट पाहू नका!”

चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशमुख यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत “आता पाचव्या बळीची वाट पाहू नका”, असे बजावले होते. मात्र त्यानंतरही आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला आणि अवघ्या २३ दिवसांत मृतांचा आकडा पाचवर पोहोचला.

या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, अपुरी सुरक्षा व्यवस्था, अवजड वाहतुकीचे नियोजन, बायपास बंद असताना पर्यायी सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

“गुन्हा दाखल झाला म्हणजे विषय संपला नाही”

अरविंद देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, गुन्हा दाखल होणे ही केवळ पहिली पायरी आहे. प्रशासनाला कोणत्या तारखेला धोक्याची माहिती देण्यात आली होती, त्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली किंवा करण्यात आली नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

बायपास बंद झाल्यानंतर शहरातील अवजड वाहतुकीचे नियोजन कोणाच्या जबाबदारीत होते, रस्त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी कोणी करायची होती आणि आवश्यक उपाययोजना वेळेत का करण्यात आल्या नाहीत, याचाही तपासातून उलगडा व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“पाच बळी म्हणजे पाच आकडे नाहीत; ते पाच उद्ध्वस्त संसार आहेत. जळगावकरांचा जीव कवडीमोल नाही. पुराव्यांच्या आधारे ज्यांची जबाबदारी निश्चित होईल, त्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आता सहावा बळी आम्हाला मान्य नाही,” असा आक्रमक इशारा अरविंद देशमुख यांनी दिला.

पाचही मृतांच्या कुटुंबांना न्याय, महामार्गावरील तातडीच्या सुरक्षा उपाययोजना आणि दोषी ठरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *