चित्रकर्मींना संधी देणाऱ्या ‘योफिमा’ युवा शिष्यवृत्तीचा तिसऱ्या वर्षी शुभारंभ

चित्रकर्मींना संधी देणाऱ्या ‘योफिमा’ युवा शिष्यवृत्तीचा तिसऱ्या वर्षी शुभारंभ

जळगाव : रील्स आणि शॉर्ट फिल्म निर्मितीच्या माध्यमातून युवा वर्गातील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे खान्देश व मराठवाड्यातील युवा चित्रकर्मींकरिता ‘योफिमा’ (YOFIMA – Young Film Maker Fellowship) युवा शिष्यवृत्तीचा सलग तिसऱ्या वर्षी शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी जळगावातील नूतन मराठा महाविद्यालय व रोटरी भवन येथे मान्यवरांच्या हस्ते योफिमा योजनेच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक व दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण हे या योजनेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. खान्देश व मराठवाडा परिसरात चित्रपट निर्मितीची सर्जनशीलता असतानाही आर्थिक अडचणींमुळे अनेक युवा चित्रकर्मींना आपल्या कलाकृती प्रेक्षकांसमोर आणता येत नाहीत. अशा प्रतिभावान युवकांना आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही फेलोशिप राबविण्यात येत आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यांतील १८ ते ३० वयोगटातील युवा चित्रकर्मी या योजनेत सहभागी होऊ शकतात. निवड समितीमार्फत निवड होणाऱ्या सर्वोत्कृष्ट सहा कलाकृतींच्या निर्मितीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

याशिवाय नोंदणी करणाऱ्या प्रत्येक युवा फिल्ममेकरला लघुपट निर्मितीसाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच कथा निवड, लेखन, दिग्दर्शन आणि पोस्ट-प्रोडक्शन यांसारख्या विविध विषयांवरील कार्यशाळांमध्ये मोफत सहभागी होता येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अनुभवी लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

या योजनेसाठी १० सप्टेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.

शुभारंभ कार्यक्रमास नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, रोटरी अध्यक्ष योगेश राका, अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, सहसचिव डॉ. सुचित्रा लोंढे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, पियुषभाई रावळ, पार्थ ठाकर, विभाग संयोजक कमलाकर रुगे, सहसंयोजक डॉ. सचिन कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

खान्देश व मराठवाड्यातील अधिकाधिक युवा चित्रकर्मींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन योफिमा आयोजन समितीचे प्रमुख मार्गदर्शक लेखक-अभिनेता प्रा. योगेश सोमण, डॉ. जयंत शेवतेकर आणि प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

9892906374 | 9373035535 | 7057344411 | 9595430774

ई-मेल : yofima2025@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *