ग्रीन सिटीच्या दिशेने जळगाव मनपाचे मोठे पाऊल; २०३० पर्यंत तापमान कमी करण्याचा संकल्प
महापौर दीपमाला काळे व आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठ
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील वाढते तापमान, घटते हरित क्षेत्र आणि पर्यावरणीय असमतोल यावर उपाययोजना करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’च्या सहकार्याने जळगावला अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी महापौर दीपमाला काळे व मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महापौर व आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीत जळगाव शहराचे तापमान कमी करण्यासाठी आगामी पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला. ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ने सन २०२६ ते २०३० या कालावधीत शहरातील तापमानात लक्षणीय घट घडवून आणण्याचे ध्येय निश्चित केले असून, त्यासाठी महानगरपालिकेकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही देण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक जागा, उद्याने तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मात्र, केवळ झाडे लावण्यावर भर न देता त्यांचे संगोपन आणि संवर्धन यालाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “वृक्षारोपणाचे काम हे केवळ नावापुरते न राहता संवर्धनाच्या दृष्टीने झाले पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असून पुढील चार महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर आणि दर्जेदार वृक्षारोपण करण्यात येईल. भविष्यात जळगावचे तापमान कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.”
बैठकीला उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’चे विजयकुमार वाणी, डॉ. धनंजय बेंद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जळगावला हरित, स्वच्छ आणि थंड शहर बनविण्याच्या या मोहिमेत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शहराच्या पर्यावरणीय भवितव्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
