महिला व बाल विकास विभागात खळबळ! परिविक्षा अधिकारी अमोल पवार यांच्याविरोधात गंभीर आरोप; विशेष चौकशीची मागणी
राजपत्रित अधिकारी संघटनेचे सचिवांना निवेदन; पदाचा गैरवापर, आर्थिक मागण्या, प्रशासकीय हस्तक्षेपासह अनेक आरोप.
महिला व बाल विकास विभागात मोठी खळबळ उडाली असून महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने परिविक्षा अधिकारी अमोल रस्तुमराव पवार यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात अमोल पवार यांची अंतरिम कामकाज व्यवस्था तात्काळ रद्द करून स्वतंत्र व निष्पक्ष विशेष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने १९ जून २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमोल पवार हे २०१६ पासून सचिव कार्यालयात अंतरिम कामकाज व्यवस्थेवर कार्यरत असून या कालावधीत त्यांनी पदाचा गैरवापर करून विभागात प्रभाव निर्माण केला आहे. अनेक प्रशासकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे, कामकाजात अडथळे निर्माण करणे आणि हितसंबंधांचे जाळे तयार केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
निवेदनात पुढे असा दावाही करण्यात आला आहे की, विभागातील विविध प्रस्ताव, आकृतिबंध मंजुरी, पदोन्नती, बदली आणि अतिरिक्त कार्यभार यांसारख्या प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करून काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक मागण्या करण्यात आल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना बदलीनंतर फोन करून आर्थिक मागणी करण्यात आल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
संघटनेने आणखी आरोप करत म्हटले आहे की, विभागातील महत्त्वाच्या कामांमध्ये अनावश्यक विलंब, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे निर्माण करून विभागाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी अमोल पवार यांची अंतरिम नियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ पदावर नियुक्त करावे. तसेच चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये म्हणून त्यांची मुंबई व पुणे महानगर क्षेत्राबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने सचिवांकडे केली आहे. या निवेदनाची प्रत मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.
या वृत्तातील सर्व आरोप महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने आपल्या निवेदनात केलेले आहेत. या आरोपांबाबत अमोल रस्तुमराव पवार किंवा महिला व बाल विकास विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित पक्षाची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध केली जाईल.
