लोहारा च्या डॉ. प्रीतीश चौधरी यांना ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने गौरव

जळगाव, दि. 24 : जळगाव जिल्ह्यातील लोहारा तालुका पाचोरा  येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना दिव्याज फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.

सन 2026 च्या पुरस्कारासाठी डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दि. 21 जून रोजी भारतीय जैन संघटना आणि दिव्याज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. प्रीतीश चौधरी हे दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, वंचित घटकांसाठी विविध जनहिताचे कार्यक्रम आयोजित करणे यासारख्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. चौधरी यांनी सांगितले की, “हा सन्मान मला अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. समाजातील शोषित, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढेही कटिबद्ध राहीन.”

डॉ. प्रीतीश चौधरी यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *