जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील बालनिकेतन विद्या मंदिर, विवेकानंद नगर परिसरातील नाल्यावरून जाणाऱ्या धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून पुलाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाला तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याचे तसेच शाळेच्या बाजूने असलेली सुरक्षेची लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे उपमहापौरांनी नमूद केले.
बालनिकेतन विद्या मंदिरात एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी दररोज या पुलाचा वापर करून शाळेत ये-जा करतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून नवीन पूल तयार होईपर्यंत विद्यार्थी व पालकांनी या धोकादायक पुलाचा वापर टाळावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला.
यासंदर्भात बोलताना उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले, “शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. धोकादायक पूल आणि तुटलेली सुरक्षेची जाळी यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
या पाहणीनंतर परिसरातील नागरिक व पालकांनीही पुलाची त्वरित दुरुस्ती करून नवीन पूल उभारण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
