ओझर गावात गावठी दारू विक्रीचा आरोप; स्थानिक महिलांची जामनेर पोलिस ठाण्यावर धाव

जामनेर तालुक्यातील ओझर गावात सर्रास गावठी दारू विक्री होत असल्याचा गंभीर आरोप गावातील महिलांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आज संतप्त असंख्य महिलांनी जामनेर पोलिस ठाणे गाठत पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली.

 

ओझर गावामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल चार ठिकाणी गावठी दारू विकली जात असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. गावठी दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून ग्रामीण भागातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. “वेळोवेळी तक्रारी करूनदेखील गावठी दारू विक्रेत्यांना लगाम घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामीण भागात खुलेआम सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीमागे नेमके कुणाचा आशीर्वाद आहे? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हातभट्टी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा प्रभावी कारवाई करत नसल्याने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी महिलांची कैफियत ऐकून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र गावातील काही जबाबदार पदाधिकारी अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचाही आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

 

दरम्यान, ओझर गावातील अवैध गावठी दारू भट्ट्यांवर प्रशासन आता कठोर कारवाई करणार का? आणि ग्रामीण भागातील दारू विक्रीला आळा बसणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *