- मनपाचे श्वान पथक ‘ॲक्शन मोड’वर; तरीही 8 वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, नागरिकांमध्ये संताप
मोहीम सुरू असतानाही कोल्हे हिल्स–बालाजी पार्क परिसरातील घटना; मनपाच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर नागरिकांचा सवाल
जळगाव | धाडस महाराष्ट्र न्यूज.
जळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. शुक्रवारी (3 जुलै) सायंकाळी सुमारे 5 वाजता कोल्हे हिल्स परिसरातील रहिवासी आठ वर्षीय हिमांशू प्रवीण पाथरे याच्यावर बालाजी पार्क परिसरात भटक्या कुत्र्याने हल्ला केला. हिमांशू हा आचार्य विनोबा भावे विवेकानंद स्कूलमधून शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जात असताना कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला.
घटनेनंतर जखमी बालकाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी दुखापत टळली असून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जवळपास रोजच एखाद्या नागरिकाला किंवा लहान मुलाला भटक्या कुत्र्यांचा फटका बसत आहे. मग महानगरपालिकेची मोहीम नेमकी कितपत प्रभावी ठरत आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गाडगेबाबा चौक परिसरात इतर भागांतील भटके कुत्रे आणून सोडले जात असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, जळगाव महानगरपालिकेने 1 जुलैपासून भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम सुरू केली असून विशेष श्वान पथकाने आतापर्यंत 43 भटके श्वान पकडले आहेत. त्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून उपचार पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्याच परिसरात सोडण्यात येत आहे.
मात्र, मोहीम सुरू असतानाही कोल्हे हिल्स–बालाजी पार्क परिसरात घडलेल्या या घटनेमुळे मनपाच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने आणि अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
