जळगाव : संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी एक तास विशेष इंग्रजी वाचन उपक्रम राबविण्यात आला. समाजसुधारक, शिक्षणप्रणेत्या आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिबा फुले यांच्या चरित्रातील प्रेरणादायी परिच्छेदाचे वाचन इयत्ता दहावीची तरन्नूम मुस्ताक तडवी, रोशन तुषार पाथरवट, तेजस्विनी संभाजी दांडगे आरोही सतीश सोनार, कावेरी जगदीश पाटील यांनी वाचन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी Equality, Education, Justice, Respect यांसारख्या शब्दांचा वापर करून सोपी इंग्रजी वाक्य तयार केली. छोटेखानी गटांमध्ये Reading Passage Activity, Word Bank Activity असे उपक्रम घेण्यात आले.

विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित छोट्या इंग्रजी परिच्छेदांचे प्रवाही वाचन करून आपली भाषिक कौशल्ये प्रदर्शित केली. तसेच “Education for All”, “Respect Everyone” अशा संदेशपर छोट्या इंग्रजी घोषवाक्यांचे वाचन करून फुले यांच्या विचारांचा सन्मान केला.
उपशिक्षिका रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महात्मा फुले यांनी समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची दारे उघडली. त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. वाचनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि भाषिक कौशल्ये दोन्ही वाढतात.”
उपक्रमात सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या कार्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
