तृतीयपंथी बांधवांच्या हातात रोजगाराची ‘रिक्षा’; मराठी प्रतिष्ठानचा पुढाकार
४५ टक्के अनुदानाचा लाभ मिळवून देणार; रिक्षा व्यवसाय सुरू झाल्यानंतरही प्रतिष्ठान देणार सहकार्य
जळगाव : तृतीयपंथी बांधवांना केवळ सहानुभूती न देता त्यांच्या हाताला रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मराठी प्रतिष्ठान, जळगाव यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
तृतीयपंथी समाजातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजना, सवलत आणि अनुदानाच्या माध्यमातून प्रवासी अथवा मालवाहतूक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करणार आहे.

या संदर्भात मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांची भेट घेऊन निवेदन साद केले. यावेळी तृतीयपंथी बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांसाठी ४५ टक्के अनुदानाची योजना उपलब्ध असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
या योजनेचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधण्याची जबाबदारी मराठी प्रतिष्ठान घेणार आहे.
ई-रिक्षातून मिळणार स्वयंरोजगाराची संधी
ई-रिक्षा व्यवसाय तुलनेने कमी कालावधीत सुरू करता येणारा व्यवसाय असल्याने तृतीयपंथी बांधवांसाठी तो रोजगाराचे प्रभावी साधन ठरू शकतो. वाहन उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करता येणार असून, त्यातून दररोज उत्पन्नाचा मार्ग निर्माण होण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे ई-रिक्षा व्यवसाय सुरू झाल्यानंतरही मराठी प्रतिष्ठान लाभार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. ई-रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण, ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेसाठी मदत तसेच व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
रिक्षांना मिळणार स्वतंत्र रंगाची ओळख.
या उपक्रमाला व्यापक स्वरूप देताना तृतीयपंथी बांधवांच्या ई-रिक्षांना विशिष्ट व आकर्षक रंग किंवा रंगसंगती देण्याची मागणी परिवहन विभागाकडे करण्यात येणार आहे. रिक्षा दूरूनच ओळखता यावी, त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि प्रवाशांनाही ती सहज लक्षात यावी, हा त्यामागील उद्देश आहे.
ही ओळख केवळ वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नसून, “तृतीयपंथी बांधवही सन्मानाने व्यवसाय करून समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वावलंबीपणे योगदान देत आहेत,” हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे ॲड. जमील देशपांडे यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठीच्या उपक्रमानंतर आता तृतीयपंथी बांधवांसाठी पुढाकार
मराठी प्रतिष्ठानने यापूर्वी जळगाव शहरात महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. संस्थेच्या माध्यमातून २२ महिलांना पिंक रिक्षा, तर १० महिलांना मालवाहू ई-रिक्षा उपलब्ध करून देत स्वयंरोजगाराची संधी निर्माण करण्यात आली आहे. याच अनुभवाच्या आधारे आता तृतीयपंथी बांधवांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
“ई-रिक्षा व्यवसायातून तृतीयपंथी बांधवांना लवकर रोजगाराचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. शासकीय अनुदानाच्या माध्यमातून ई-रिक्षा मिळवून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असून, व्यवसाय सुरू झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू,” असे ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी समाज कल्याण विभाग, परिवहन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, बँका आणि संबंधित शासकीय यंत्रणांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. पात्र लाभार्थी निवड, अनुदान, कर्जप्रक्रिया, कागदपत्रे आणि ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मराठी प्रतिष्ठान प्रयत्नशील राहणार आहे.

अधिक माहितीसाठी : मराठी प्रतिष्ठान, गणपती नगर, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा.