अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाल-श्रीफळ देऊन सन्मान; “खडसे हे महाराष्ट्रातील मोजक्या लोकनेत्यांपैकी एक”
मुक्ताईनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मुक्ताईनगर येथे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदगावकर यांनी त्यांना शुभेच्छा देत शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी खडसे परिवारातर्फे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बाळा नांदगावकर यांचे शाल तसेच मुक्ताईची मूर्ती देऊन स्वागत व सत्कार केला.
यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव केला. “महाराष्ट्रात मोजकेच लोकनेते आहेत आणि त्यापैकी एकनाथ खडसे हे एक लोकनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सोबत काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले,” असे गौरवोद्गार नांदगावकर यांनी काढले.
खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील अनुभव, जनसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत नांदगावकर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खडसे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
या भेटीच्या निमित्ताने खडसे परिवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील जुन्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाल्याचे दिसून आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई, किरण तळेले, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रदीप पाटील, राहुल चव्हाण, रजक सय्यद यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
