धोकादायक विद्युत डीपी, तारांवर मनपा अॅक्शन मोडमध्ये; दुर्घटना घडल्यास एमएसईबीची जबाबदारी – उपमहापौर मनोज चौधरी
जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये उघडे व धोकादायक विद्युत डीपी तसेच लोंबकळणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या विद्युत तारांबाबत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा उपमहापौर मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणा तातडीने सुरक्षित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
शहरातील अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या अवस्थेत असून, काही ठिकाणी धोकादायक स्वरूपाच्या विद्युत तारा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे अशा सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले.
धोकादायक विद्युत स्पॉटचे सर्वेक्षण करून त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी विद्युत यंत्रणेमुळे दुर्घटनेची शक्यता आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती, संरक्षणात्मक उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही तातडीने करण्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्ग, गणेश मंडळे तसेच नागरिकांची मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणांची विशेष तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. या ठिकाणी असलेल्या विद्युत तारा, डीपी आणि इतर विद्युत यंत्रणा सुरक्षित आहेत की नाही, याची पाहणी करून संभाव्य धोका दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
“बैठकीत दिलेल्या सूचनांवर तातडीने उपाययोजना करा. भविष्यात धोकादायक विद्युत यंत्रणेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी एमएसईबी विभागाची असेल,” असे स्पष्ट निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी बैठकीत दिले.
मनपा आणि एमएसईबी विभागाने समन्वयाने काम करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या सर्व विद्युत धोक्यांचे निराकरण करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.
या बैठकीस मनपा विद्युत विभाग प्रमुख, एमएसईबीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. डी. उन्हाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. एल. नेमाडे, सहाय्यक अभियंता हर्षल नेहेते, सहाय्यक अभियंता कुरसंगे, सहाय्यक अभियंता यास्मीन तडवी, सहाय्यक अभियंता ललिता पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेबाबत तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
