कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार चित्राताई वाघ यांना निवेदन
जळगाव : कोविड-१९ महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावलेल्या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने जळगाव येथे आमदार सौ. चित्राताई वाघ यांना १६ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देण्यात आले. समितीचे निलेश जयराज बोरा यांनी हे निवेदन दिले.
कोविड काळात जळगाव जिल्ह्यातील कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांनी वॉर्डबॉय (कक्षसेवक), ॲम्ब्युलन्स चालक, आया, बेड सहाय्यक आदी विविध पदांवर काम करत रुग्णांची सेवा बजावली. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय महिला व बाल रुग्णालय मोहाडी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय आदी ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात सेवा दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ३ मे २०२१ रोजीच्या परिपत्रकातील मुद्दा क्र. १७ नुसार, किमान १०० दिवस कोविड सेवा पूर्ण केलेल्या आरोग्य व्यावसायिकांना भविष्यातील नियमित किंवा कंत्राटी शासकीय नियुक्त्यांमध्ये प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये अनेक पदे रिक्त असून, या रिक्त पदांवर कोविड काळात सेवा बजावलेल्या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी या अनुभवी कर्मचाऱ्यांचा उपयोग करून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय राज्य शासनाच्या परिवहन महामंडळाच्या धर्तीवर कामगार विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कंत्राटी कोविड कर्मचारी महामंडळ स्थापन करून, कामगार विभाग तसेच इतर शासकीय विभागांच्या आस्थापनांवर नियमित पदभरतीमध्ये या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली.
या मागण्यांसंदर्भात कामगार मंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करून कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार चित्राताई वाघ यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदन देताना कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीचे निलेश जयराज बोरा उपस्थित होते.
