दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण; दूध संघाच्या आधुनिक वाटचालीला नवी दिशा!

जळगाव जिल्हा दूध संघात दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण

शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचेही उद्घाटन; दूध उत्पादकांच्या हितासाठी दूध संघाची आधुनिक वाटचाल

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण गुरुवारी (१३ ऑगस्ट) करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकाचे लोकार्पण पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

या वेळी दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. स्मारकाच्या लोकार्पणावेळी उपस्थित मान्यवरांनी दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या कार्याला आणि शेतकरी व दूध उत्पादकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला अभिवादन केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, दादासाहेब जे. टी. महाजन यांनी उभारलेला दूध संघ हा केवळ एक व्यवसायिक उपक्रम नसून हजारो शेतकरी आणि दूध उत्पादक कुटुंबांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली संस्था आहे. त्यांच्या विचारांवर आणि तत्त्वांवर वाटचाल करत दूध संघ अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण

या कार्यक्रमात नूतनीकरण करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले. आधुनिक दुग्ध व्यवसाय, पशुपालन, दूध उत्पादनातील गुणवत्ता, नवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या बाजारपेठेच्या गरजांबाबत शेतकरी व दूध उत्पादकांना प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यासोबतच मुख्य दुग्धशाळेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात आले. सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक औद्योगिक प्रक्रियांना चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

“दादासाहेबांच्या विचारांचे खंबीर वारसदार”

दूध संघाचे चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थापक जे. टी. महाजन यांनी घालून दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

दूध संघ ही केवळ दूध संकलन आणि प्रक्रिया करणारी संस्था नसून हजारो शेतकरी व दूध उत्पादक कुटुंबांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली संस्था आहे. आम्ही दादासाहेबांचे रक्ताचे वारसदार नसलो, तरी त्यांच्या विचारांचे खंबीर वारसदार म्हणून दूध संघाची वाटचाल पारदर्शकपणे आणि यशस्वीपणे पुढे नेऊ, असे आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

शेतकरी आणि दूध उत्पादकांना अधिक सक्षम करणे, संस्थेचे आधुनिकीकरण करणे, पारदर्शकता वाढवणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी दूध संघाला सक्षम बनवणे यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गिरीश महाजनांचा व्हिडिओ संदेश

कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. दादासाहेब जे. टी. महाजन यांनी दूध संघाची उभारणी करताना हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणारा आधार निर्माण केला, असे त्यांनी नमूद केले.

दादासाहेबांच्या त्याग, संघर्ष आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेच्या स्मरणार्थ दूध संघाच्या प्रांगणात त्यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना होती. या स्मारकामुळे त्यांच्या स्मृती आणि विचार कायम प्रेरणा देत राहतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

शरद महाजन यांनी व्यक्त केली कृतज्ञता

दादासाहेब जे. टी. महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना दूध संघाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दादासाहेबांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये आणि शेतकरी व दूध उत्पादकांप्रती असलेली बांधिलकी यांची आठवण त्यांनी करून दिली.

दादासाहेबांच्या स्मृतींना दूध संघाच्या प्रांगणात कायमस्वरूपी स्थान मिळणे ही कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. अमोल जावळे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी आमदार रमेश चौधरी, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह दूध संघाचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, दूध उत्पादक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी संजय हिंगणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केली. त्यांनी दूध संघाची स्थापना, आजपर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील आधुनिकीकरणाची दिशा याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन शिवानी नेवे यांनी केले, तर आभार संचालक अरविंद देशमुख यांनी मानले.

दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण, शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण या तिन्ही उपक्रमांमुळे दूध संघाच्या परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून दूध संघाची आधुनिक वाटचाल सुरू असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *