रामेश्वर कॉलनीतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व कायमस्वरूपी केंद्राची मागणी.

रामेश्वर कॉलनीतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व कायमस्वरूपी केंद्राची मागण

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९ अंतर्गत रामेश्वर कॉलनी परिसरातील मुली व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, परिसरात मोफत स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे तसेच कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी जळगाव महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी आणि महिला वास्तव्यास आहेत. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असून, अशा परिस्थितीत मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात प्रशिक्षणाचा दर्जा सर्वसमावेशक असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये कराटे, सेल्फ डिफेन्सची आधुनिक तंत्रे, आपत्कालीन प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्याच्या पद्धती, महिलांचे कायदेशीर हक्क, महिला सुरक्षा कायदे, हेल्पलाईनची माहिती तसेच मानसिक सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश करण्याची विनंती करण्यात आली आहे.

याशिवाय, केवळ एकदाच शिबिर आयोजित करून थांबू नये, तर रामेश्वर कॉलनी परिसरात मुलींसाठी कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण वर्ग सुरू झाल्यास परिसरातील मुलींना सातत्याने प्रशिक्षण घेता येईल आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व धाडस निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

या उपक्रमामुळे मुलींची सुरक्षितता वाढण्याबरोबरच त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता विकसित होईल. तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिकेने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात लवकरात लवकर मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे तसेच कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

हे निवेदन हर्षल वाणी, संदीप मांडोळे, गणेश पाटील आणि अविनाश पाटील यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्तांना सादर केले असून, या मागणीला परिसरातील नागरिक आणि पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *