राजूमामांच्या पाठपुराव्याला मोठे यश; अजिंठा चौफुली–विमानतळ मार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजू
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्या गेल्या दोन वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्षांतर्गत अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
या निधीतून संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक एलईडी पथदिवे बसविण्यात येणार असून, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होईल. वाहनचालक, पादचारी, नागरिक तसेच विमानतळाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार असून, शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार आहे.
या विकासकामासाठी आमदार राजूमामा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रस्तावाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभल्याने निधी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदार राजूमामा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) म्हणाले, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या कामांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.”
