जळगाव येथे कंत्राटी कामगार कायदा व कामगार संहितांबाबत मार्गदर्शन बैठक संपन्न

 

जळगाव:- कामगार आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच कामगार उपायुक्त, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांच्या समस्या व व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या विषयावर कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम १९७० अंतर्गत नोंदित आस्थापना मालक व कंत्राटदार यांची मार्गदर्शन बैठक एमआयडीसी जळगाव येथील परिवर्तन सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस विविध आस्थापनांचे प्रतिनिधी, कंत्राटदार तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रेमंड लाईफ स्टाईल लि. चे मानव संसाधन विभाग अधिकारी राहुल क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचा उद्देश व प्रास्ताविक सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव डॉ. राजू गुल्हाने यांनी केले. त्यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या, त्यांचे कायदेशीर संरक्षण तसेच नवीन कामगार संहितांमधील तरतुदींबाबत माहिती दिली.

त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी आप्पा चाथे यांनी “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता २०२०” अंतर्गत कंत्राटी कामगार विषयक तरतुदींवर सादरीकरण केले. त्यांनी कंत्राटी कामगार अधिनियम १९७० मधील नोंदणी, परवाना, कंत्राटी कामगारांचे हक्क व नियोक्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या बैठकीत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. तसेच चारही नवीन कामगार संहितांतील प्रमुख तरतुदींविषयी डॉ. राजू गुल्हाने यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास आस्थापना मालक व कंत्राटदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *