- मनपा फाइल चोरी प्रकरणात गुन्हा दाखल; घरकुल गैरव्यवहाराशी संबंधित मूळ कागदपत्रे गाय
जळगाव | धाडस महाराष्ट्र न्यूज
जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागातील अभिलेख कक्षातून घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मूळ फाईली गायब झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मनपा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक (नगर रचनाकार) अमोल वसंतराव पाटील (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे C.R. No. 200/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नगर रचनाकार विभागातील सर्व महत्त्वाचे अभिलेख रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवले जातात. सन 2006 मधील मनपा घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गट क्र. 337/3 अ/1 व गट क्र. 337/3 अ/2 यांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मूळ फाईलीही अभिलेख कक्षात ठेवण्यात आल्या होत्या.
मात्र, 31 जानेवारी 2024 पासून न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित फाईली वारंवार मागवूनही त्या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण अभिलेख विभागात शोधमोहीम राबविण्यात आली. तरीही संबंधित फाईली सापडल्या नसल्याने त्या रेकॉर्ड रूममधूनच गायब झाल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, 31 जानेवारी 2024 ते 2 जुलै 2026 या कालावधीत अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममधून संबंधित मूळ फाईली विनापरवानगी चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या फाईली न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याने त्यांचे गायब होणे गंभीर मानले जात असून, तपासातून नेमके सत्य समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
