विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७ : जळगावच्या युवकांना राष्ट्रीय स्तरावर संधी

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७ : जळगावच्या युवकांना राष्ट्रीय स्तरावर संधी

विविध स्पर्धा व उपक्रमांतून युवकांना नेतृत्व, नवोपक्रम आणि कला-कौशल्य सादर करण्याची संधी

जळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची यावर्षीपासून ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ (VBYLD) या स्वरूपात पुनर्रचना करण्यात आली आहे. ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ३०वा राष्ट्रीय युवा महोत्सव–VBYLD २०२७ जानेवारी २०२७ मध्ये नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येणार आहे.

मेरा युवा भारत, जळगाव यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना VBYLD-2027 मधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत क्विझ, निबंध, जिल्हास्तरीय PPT, राज्यस्तरीय VBYLD आणि राष्ट्रीय संवाद अशा टप्प्यांतून निवड प्रक्रिया होणार आहे. विविध स्पर्धांसाठी सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे.

यामध्ये शासन व नागरी सेवा, हवामान सुरक्षा, लोकसंख्यात्मक लाभांश, उद्योग-उद्योजकता, आदिवासी नेतृत्व, नवोन्मेष, पर्यटन, तंत्रज्ञान आणि रोजगारक्षमता यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

कला आणि नवोपक्रमालाही व्यासपीठ

सांस्कृतिक ट्रॅक अंतर्गत लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कविता लेखन आणि पथनाट्य या कलाप्रकारांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा २ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच ‘Innovate for BHARAT’ अंतर्गत Design for Bharat, Hack for Social Cause आणि Youth Entrepreneurs Challenge या तीन आव्हानांचा समावेश करण्यात आला आहे. या आव्हानांसाठी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६ आहे. सहभागी युवकांना यापैकी कोणत्याही एका आव्हानात सहभागी होता येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी

VBYLD-2027 च्या माध्यमातून जळगावच्या युवकांना कल्पना, कला, नवोन्मेष, उद्योगकल्पना आणि नेतृत्वगुण राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. निवडक युवकांना जानेवारी २०२७ मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होता येणार असून, उत्कृष्ट कल्पना पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी देखील मिळू शकते.

जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पात्र युवक-युवतींनी VBYLD-2027 मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिषेक चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी : mybharat.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *