जळगाव (प्रतिनिधी):
शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी धर्मरथ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विनायक किशोर पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक दोनच्या सर्व नगरसेवकांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले असून, तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

‘शिवाजीनगर’ नव्हे, ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असावा नामोल्लेख
निवेदनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गुगल मॅप आणि शासकीय परिपत्रकांमध्ये होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख. श्री. विनायक पाटील यांनी म्हटले आहे की, सर्च इंजिनवर ‘शिवाजीनगर’ असा उल्लेख होणे ही गंभीर बाब असून, सर्वत्र ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असा ससन्मान उल्लेख करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तसेच येथील उड्डाणपुलाचे नामकरणही ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे अधिकृतपणे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा
उड्डाणपुलावर पादचाऱ्यांसाठी जिन्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ते कुठल्या दिशेला जातात, याचे दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांची दिशाभूल होते. यासोबतच खालील प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे:

आरोग्य सेवा: कोविड काळापासून बंद असलेले महानगरपालिकेचे प्रसूती गृह तातडीने पुन्हा सुरू करावे.
सुरक्षा: वाढती गुंडागर्दी आणि चोऱ्या रोखण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही बसवावेत आणि पोलीस बीट मार्शलची पेट्रोलिंग वाढवावी.
युवकांसाठी सुविधा: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी परिसरात सुसज्ज जिम आणि पैलवानी आखाडा तयार करावा.

स्वच्छता व संवाद: आरोग्य विभागाने सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रभागातील स्वच्छतेवर लक्ष द्यावे आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या मार्गी लावाव्यात.
विकासकामे: मुलांसाठी व ज्येष्ठांसाठी बगीच्याचे नूतनीकरण, मंदिराचा जिर्णोद्धार आणि अवजड वाहनांची वाहतूक वळवणे याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.
सत्ता तुमचीच, मग कामाला विलंब का?
“सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपलेच सरकार असून मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवक सर्वच सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे या कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावणे सोपे आहे,” असेही श्री. पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. महापालिकेतील रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करावा, जेणेकरून प्रभागातील विकासकामे सुरळीत होतील, असेही त्यांनी सुचवले आहे.
येणाऱ्या महासभेत या सर्व प्रश्नांवर ठोस चर्चा होऊन ते मार्गी न लागल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मरथ फाऊंडेशनतर्फे देण्यात आला आहे.
