पारोळा (प्रतिनिधी) : फास्टॅगची सुविधा असूनही टोल कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. टोलचा बूम बोनेटवर पडल्याच्या किरकोळ वादातून सबगव्हाण टोल नाक्यावरील १० ते १२ कर्मचाऱ्यांनी एका महिलेसह तिच्या कुटुंबावर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी बादलीने निर्दयीपणे प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी, १२ एप्रिल रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली असून संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील एक महिला आपल्या दोन मुलांसह, दिराणी व पुतण्यासोबत रविवारी जळगाव येथून धुळे येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने (क्रमांक MH 19 EP 8530) निघाल्या होत्या. दुपारी सव्वा चारच्या सुमारास त्यांची कार पारोळा ते सबगव्हाण दरम्यानच्या टोलनाक्यावर पोहोचली. फास्टॅगमुळे टोल आपोआप कट झाला असेल, या समजातून चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच क्षणी टोलचा बूम अचानक कारच्या बोनेटवर येऊन पडला.

कुटुंबाला बेदम मारहाण आणि विनयभंग
बूम गाडीवर पडल्याबाबत विचारणा करण्यासाठी महिलेचा पुतण्या गाडीखाली उतरला असता, टोल कॅबिनमधील कर्मचाऱ्यांनी त्याला धक्काबुक्की सुरू केली. आपल्या मुलाला आणि पुतण्याला वाचवण्यासाठी कारमधील महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग येऊन टोल नाक्यावरील व्यवस्थापकासह इतर कर्मचाऱ्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी बादलीचा वापर केल्याने दोन्ही महिलांच्या पायावर आणि कमरेवर गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, या झटापटीत महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
सोन्याची पोत लंपास
मारहाणीच्या या गोंधळात आईच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि काकूच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची माळ संशयितांनी चोरून नेली किंवा ती गहाळ झाली आहे.

पाच जणांसह १०-१२ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
शरद पुंडलिक चौधरी (व्यवस्थापक, रा. मुकटी, धुळे)
समाधान दयाराम सरदार (रा. सावखेडा)
गोरख रोहिदास पाटील (रा. मुकटी, धुळे)
निलेश आनंदराव खेमनाथ (रा. गोकुळ नगर, धुळे)
तुकाराम किसन गवळी (रा. दळवेल, पारोळा)
या पाच जणांसह इतर ५ ते ६ अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंग, मारहाण आणि लूटमारीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत असून, टोल नाक्यावरील या गुंडगिरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
