जळगाव: सकल ब्राह्मण समाज एकत्र येण्याच्या उद्देशाने जळगावात ‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ निमित्त विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी उत्सवाचे १७ वे वर्ष असून, बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रक्तदान शिबिराने झाली उत्सवाची सुरुवात
यंदाच्या जन्मोत्सवाची सुरुवात रविवार, ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराने उत्साहात झाली आहे. समाजातील दातृत्वाची भावना जोपासण्यासाठी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

१२ एप्रिलला विराट मोटारसायकल रॅली
वातावरण निर्मितीसाठी येत्या रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाबळ चौकातून विराट मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली महाबळ चौक, काव्यरत्नावली चौक, रिंगरोड, शास्त्री टावर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक आणि वीर सावरकर पुतळ्यावरून पोलीस मल्टिपरपज हॉल येथे विसर्जित होईल. याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजता दानदाते व श्रमदात्यांचा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

१९ एप्रिल रोजी मुख्य शोभायात्रा आणि जन्मोत्सव
जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम रविवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ग्रामदैवत श्री राम मंदिरात परशुराम पूजनाने होईल. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता सुभाष चौकातून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या शोभायात्रेत:
भगवान परशुरामांचा भव्य रथ.
ढोल-ताशा, लेझीम आणि दांडिया पथकांचा सहभाग.
महिलांचे तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिके.
हजारो परशुराम दूतांचा सहभाग.
या शोभायात्रेचा समारोप शिवतीर्थावर होणार आहे.

अभिनव उपक्रम: २८ पानी दिनदर्शिकेचे प्रकाशन
यंदा उत्सवाचे वेगळेपण म्हणून निमंत्रण पत्रिकेऐवजी २८ पानांची ‘मराठी नववर्ष दिनदर्शिका’ प्रकाशित करण्यात आली आहे. यात सर्व ब्राह्मणांच्या मूळ कुळ पुरुषांची माहिती आणि समाजाला उपयुक्त ठरेल अशी महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट आहे. ही दिनदर्शिका प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात येत असून, ज्यांना मिळाली नाही त्यांनी ती शिवतीर्थावर प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन माजी अध्यक्ष नितीन पारगावकर यांनी केले आहे.

वर्षभर व्याख्याने व स्नेह संमेलन
येत्या वर्षभरात छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह आणि गंधे सभागृहात विविध व्याख्याने आणि स्नेह संमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला यांची होती उपस्थिती: यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खतोड, अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी, माजी अध्यक्ष नितीन पारगावकर, सुरेंद्र मिश्रा, सहसचिव पंकज पवनीकर, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाळ पंडित, महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई खतोड, नूतन अध्यक्षा पूनम तिवारी, प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
