जळगाव: शहरात ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने एका विवाहितेची फसवणूक करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी गोकुळ रमेश चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय फिर्यादी महिला ही आपल्या कुटुंबासह जळगाव शहरात राहते. आरोपी गोकुळ चव्हाण हा तिच्या पतीचा मित्र असून त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. फिर्यादीने शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज केला होता. आरोपीने तिला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केवायसी (KYC) अपडेट करण्याचे आमिष दाखवले.

दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास, फिर्यादी महिला घरात एकटी असताना आरोपी तिच्या घरी आला. त्याने केवायसीसाठी कागदपत्रे मागितली आणि त्यानंतर महिलेशी अश्लील संभाषण करून विनयभंग केला. पीडितेने या प्रकाराला कडाडून विरोध केला.

घटनेनंतर पीडितेने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली, ज्यामुळे पती आणि आरोपीमध्ये वाद झाला. तेव्हापासून आरोपी गोकुळ चव्हाण हा पीडितेचा पाठलाग करत असून तिला मानसिक त्रास देत आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने जळगाव शहर

पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसांनी आरोपी गोकुळ रमेश चव्हाण (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७५(२) आणि ७८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर सुरेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
