भुसावळ (प्रतिनिधी):
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंग (साखळी चोरी) करून दहशत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला जेरबंद करण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (DB Pathak) अत्यंत शिताफीने ही कारवाई केली.

गुप्त बातमीदाराने दिला सुगावा
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी सादिक अलीच्या ठावठिकाण्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. तो एका गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत ‘मोस्ट वॉन्टेड’
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, सादिक अली हा केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील फरार आरोपी आहे. त्याच्यावर खालील जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत:
- जळगाव जिल्हा: जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर आणि चाळीसगाव ग्रामीण.
- इतर जिल्हे: वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर (औरंगाबाद).
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

तपास पथक:
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता
सादिक अली उर्फ ‘आतंक’ याला अटक झाल्यामुळे राज्यातील चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस दलात पथकाचे विशेष कौतुक होत आहे.
