यावल (प्रतिनिधी): वनविभागाने गुरुवारी सकाळी धडाकेबाज कारवाई करत अवैधरीत्या जळाऊ लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले आहे. या कारवाईत सुमारे १.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

नेमकी घटना काय?
गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:२५ च्या सुमारास सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पिळोदा–भुसावळ रस्त्यावर गस्त घालण्यात आली. यावेळी एका विना क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स पिकअप वाहनावर संशय आल्याने त्याची तपासणी केली असता, त्यात निम प्रजातीचे जळाऊ लाकूड आढळून आले.

कारवाईचा तपशील
जप्त मुद्देमाल: २.४०० घन मीटर निम लाकूड (किंमत ₹२,२५६) आणि वाहन (किंमत ₹१,८०,०००).
एकूण किंमत: ₹१,८२,२५६.
चालकाची चलाखी: वनविभागाचे पथक दिसताच चालकाने गाडीची ‘सेन्सर पिन’ काढून घेतली आणि वाहन सोडून पळ काढला. अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाडी टोचन करून मुख्य विक्री केंद्र, यावल येथे आणण्यात आली.

कायदेशीर कारवाई
वनविभागाने या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि महाराष्ट्र वन नियमावली २०१४ च्या विविध कलमान्वये गुन्हा (क्र. ०१/२०२६) दाखल केला आहे.
कारवाई करणारे पथक
ही यशस्वी मोहीम उपवनसंरक्षक (जळगाव), सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश होता:
आय. एस. तडवी (वनपाल, डोंगरकठोरा)
बी. बी. गायकवाड (आगार रक्षक)
आय. बी. चव्हाण (वनरक्षक, गस्ती पथक)
एस. आर. तडवी (पोलीस कॉन्स्टेबल)