मंत्री गिरीश महाजन यांना खुले पत्र; कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत उपस्थित झाले प्रश्न
जळगाव – राज्याचे वरिष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून एका भाजप कार्यकर्त्याने सोशल मीडियावर खुले पत्र लिहिले असून त्यात पक्ष संघटना, कार्यकर्त्यांची उपेक्षा आणि स्थानिक राजकारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे पत्र प्रियंका हर्षल चौधरी यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले असून त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पत्रात कार्यकर्ते हर्षल चौधरी यांनी नमूद केले आहे की, पक्षाच्या सुरुवातीच्या काळात सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर नेतृत्व घडले. मात्र आज जळगाव जिल्ह्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपेक्षित स्थान मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी पक्षांतर करून आलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याची टीकाही पत्रातून करण्यात आली आहे.

तसेच जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नंतर पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागले, अशी खंतही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक राजकारणातील तडजोडी, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि जिल्ह्याच्या विकासाबाबत ठोस दूरदृष्टी नसल्याचे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुलाबराव देवकर यांच्या कुटुंबातील विशाल देवकर यांना जिल्हा परिषद सदस्यपदासाठी पुढे आणण्याच्या चर्चा सुरू असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आतापर्यंत महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांना पुढे केले जात असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे.

पत्राच्या शेवटी कार्यकर्त्यांनी हे पत्र टीका नसून जुन्या लोकनेत्याला साद असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन पक्ष संघटनेला बळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. योग्य वेळी अशा प्रकारांना आळा घालून कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सदर खुले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून जळगावच्या राजकीय वर्तुळात याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
