पाणीपुरी खाताना ओळख, लग्नाच्या आणाभाका, काही दिवसांनी तरुणीबाबत धक्कादायक गोष्ट समोर; तरुणाने नको ते केलं..
जिच्यावर प्रेम केले, ती निघाली तृतीयपंथीय… नाद सोड म्हटले तरीही लागली मागे… अखेर खून करूनच सुटला पिच्छा !,
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, जळगाव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे.

तरुणीचे सौंदर्य बघून तरुण तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांची पाणीपुरी खात असताना ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, पण प्रेमात काही असं घडली की, त्या तरुणाने प्रेयसीचा पद्मालय येथील जंगलामध्ये जाळून तिची हत्या केली. आरोपी तरुणाला काही दिवसानंतर कळले की, तो जिच्यावर प्रेम करायचा ती तरुणी नसून तृतीयपंथी आहे. याच रागातून ही धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

पहुर येथील स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील (वय 21) आणि आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे या दोघांची ओळख पाणीपुरी खात असताना झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र, सदर तरुणी ही तृतीयपंथी असल्याचं लक्षात आल्यावर आणि तिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने अखेर या प्रेम कहाणीचा अंत केला. तृतीयपंथी असलेल्या तरुणीची हत्या करून तिला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं समोर आलं.

आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे ही (रा.सोनरार खैरागड, छत्तीसगड) राहणार असून सध्या सुरत येथे वास्तव्याला होती. स्वप्नील 2024 मध्ये पोलीस भरतीची परीक्षा देत नाशिकला शिक्षण घेत होता. दरम्यान, काही महिन्यापूर्वी नाशिक येथे पोलीस भरती अकादमीच्या बाहेर असणाऱ्या एका ठेल्यावर दोघांची ओळख झाली. पुढे एकमेकांचा मोबाईल नंबर घेऊन चॅटिंगद्वारे दोघांच्या ओळखी वाढल्या. ओळखीतून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसानंतर आपण ज्या मुलीवर प्रेम करत आहोत ती तृतीयपंथी असल्याचं कळताच स्वप्निलने तिच्याशी संपर्क बंद केला.
मात्र, आकांक्षा स्वप्निलच्या मागे लग्नाचा तगादा लावून बसली होती. तरी स्वप्निलने तिला सांगितलं की, ‘आता आपल्यात काही नाही’, मात्र ती तयार नव्हती. आकांक्षा पहुर येथील स्वप्निलच्या घरी देखील आली होती. स्वप्निलच्या आई-वडिलांनी त्याला ‘आकांक्षाचा नाद सोड’, म्हणून सांगितलं. अखेर आकांशाने ‘दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर आणि माझ्यासोबतही लग्न कर’, असा प्रस्ताव मांडला. दोघांमध्ये तेव्हा तात्पुरता बोलणं झालं होतं. तरीही आकांक्षाने स्वप्निलच्या मागचा लग्नाचा तगादा सोडला नाही. आकांक्षाच्या त्रासाला स्वप्नील कंटाळलेला होता अखेर त्याने आकांक्षाला संपवण्याचा कठोर निर्णय घेतला.

अखेर दोघांचा भेटण्याचा दिवस ठरला. सुरतवरून आकांक्षा उर्फ अजय गद्रे ही जळगाव येथे शनिवारी 31 जानेवारी रोजी उतरली. स्वप्नील आणि आकांक्षा दोघांनी रस्त्यामध्ये एका वाईन शॉपमधून दोन बिअरच्या बाटल्या घेतल्या. त्या बाटल्या घेऊन ते पद्मालय येथे दुपारी चार वाजता गेले. पद्मालय येथील श्री. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी जवळच्या जंगलात गप्पा मारण्यासाठी गेले. तेथे स्वप्निलने आकांक्षाला शेवटचं पुन्हा एकदा समजावलं की, ‘मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझा नाद सोड’, पण, आकांक्षाने काही ऐकलं नाही. त्यानंतर स्वप्निल आणि आकांक्षामध्ये झटापटी झाली आणि ती खाली पडली. त्यानंतर अर्धमेले अवस्थेत आकांक्षाच्याच ओढणीने तिचा गळा दाबून तिला जीवेठार मारले. तिचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर त्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोल आणले आणि आकांक्षाच्या शरीरावर टाकून तिला पेटवून तेथून स्वप्निलने पळ काढला.

4 फेब्रुवारी रोजी पद्मालय वनपरिक क्षेत्रात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळलेला होता. घनदाट जंगलात मोबाईलला नेटवर्क देखील नव्हतं. मानवी वर्दळ नसल्याने कोणाकडून काही सुगावा लागणं शक्य नसल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसोबत मोठं आव्हान होतं. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहून गायकवाड यांना सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र ओल्ड, ईश्वर पाटील आणि विनोद पाटील यांचे पथक हाताशी घेतले.
मृतदेहाच्या शवविच्छेदनावेळी तो एक दिवसापूर्वीच जाळल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र, फॉरेन्सिक तज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून मृत्यू 30 किंवा 31 जानेवारी दरम्यान झाल्याचं स्पष्ट केलं. तसेच पथकाने मृतदेहाचे निरीक्षण केलं असताना पायाच्या नखावर मॅजेंटा रंगाची नेल पॉलिश व नाकात सोन्याची मुरनी असल्याचं आढळलं. तोच धागा पकडून व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार पोलिसांनी त्या दिशेने माहिती संकलित करणं सुरू केलं. त्यावरून मयत कुठून आला? कोणासोबत आला? याची माहिती संकलित केली. तरुणाने तृतीयपंथीयाला पद्मालयाला नेलं व गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पद्मालयाच्या जंगलात नेऊन तृतीयपंथीयाची हत्या केल्याचं स्पष्ट झालं गोपनीय माहिती भौतिक व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी स्वप्नील पाटीलला ताब्यात घेतलं. त्याची सखोल चौकशी केल्याने त्याने हत्येची कबूली दिली.
