यावल (प्रतिनिधी):
तालुक्यातील वनोली गावात वाढत्या अतिक्रमणाने ग्रामस्थ हैराण झाले असून, वारंवार तक्रारी करूनही सरपंच आणि ग्रामसेवक कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. राजकीय दबावापोटी ग्रामपंचायत प्रशासन या प्रकरणाकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा आता संपूर्ण गावात रंगू लागली आहे.

काय आहे प्रकरण?
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील सतीश योगराज चौधरी व विजय योगराज चौधरी यांनी विविध ठिकाणी अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तींना शासकीय घरकुल मंजूर असतानाही त्यांनी ते भाड्याने दिले असून स्वतः मात्र इतर जागांवर अतिक्रमणे थाटली आहेत. या व्यक्तींचे मूळ गाव म्हैसवाडी असून तेथे त्यांच्या नावे जमिनीचा उतारा असतानाही वनोलीत आल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणास सुरुवात केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पुराव्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष:
अतिक्रमित जागेवर आर.सी.सी. घरांचे बांधकाम झाल्याचे जिओ-टॅग फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. एकाच व्यक्तीने दोन ते तीन ठिकाणी अतिक्रमण केल्याचे पुरावे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे देण्यात आले आहेत. मात्र, तरीही प्रशासन केवळ ‘नोटीस पाठवली’ एवढेच उत्तर देऊन वेळकाढूपणा करत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

उलट चोराच्या उलट्या बोंबा:
अतिक्रमणधारकांनी चक्क वकिलामार्फत नोटीस धाडून ग्रामपंचायतीची कारवाईच चुकीची असल्याचे म्हटले आहे. अतिक्रमणधारक ग्रामपंचायतीला जुमानत नसल्याने आणि ग्रामस्थांनाच खोटे ठरवत असल्याने गावात तणावाचे वातावरण आहे.

राजकीय दबावाची चर्चा:
ग्रामसेवक प्रवीण चौधरी आणि सरपंच नक्की कोणत्या दबावाखाली आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही कारवाई शून्य असल्याने वरिष्ठ अधिकारीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? अशी शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.
आता या प्रकरणावर पंचायत समिती किंवा जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
