जळगाव | प्रतिनिधी:
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) या क्रिकेट महाकुंभाचा शनिवारी कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात जामनेर सातपुडा हिरोजने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ६ गडी राखून मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मैदान वानखेडेपेक्षाही सरस: गिरीश महाजन
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही अधिक सुंदर सोयीसुविधा जळगावच्या या मैदानावर उपलब्ध आहेत. या स्पर्धेतून भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील.” यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील कुस्ती आणि कबड्डीच्या आठवणींना उजाळा दिला, ज्यावर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी “गिरीश आता राजकारणाच्या खेळात रंगलेत” अशी मिश्किल टिप्पणी केली.

सुरेशदादांच्या रणजी निवडीच्या आठवणी
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल माहिती देताना सांगितले की, इंदूरमध्ये असताना त्यांची निवड रणजी संघात झाली होती. ग्रामीण खेळाडूंना एवढे मोठे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांनी जैन इरिगेशनच्या अशोक जैन आणि अतुल जैन यांचे कौतुक केले.

सामन्याचा वृत्तांत: गोलंदाजांची धार अन् फलंदाजांची फटकेबाजी
नाणेफेक जिंकून जामनेर सातपुडा हिरोजचा कर्णधार शतायू कुलकर्णी याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

- पाचोरा एसकेटी योद्धाजची फलंदाजी: जामनेरच्या भेदक गोलंदाजीसमोर पाचोराचा संघ निर्धारित षटकात ११४ धावांवर गारद झाला. रोहित तलरेजा याने ३० धावा (१५ चेंडू) तर सिद्धेश देशमुखने २८ धावा केल्या. जामनेरच्या रामकृष्णा राठोड याने १४ निर्धाव चेंडू टाकत ३ गडी बाद केले, तर कर्णधार शतायू कुलकर्णीनेही ३ बळी घेतले.
- जामनेरचा पाठलाग: ११५ धावांचे लक्ष्य जामनेरने सहज गाठले. प्रद्युम्न महाजन याने अवघ्या १४ चेंडूत ३४ धावांची तुफानी खेळी केली. त्याला ललित पाटील (२९ धावा) आणि नाबाद क्रिशी नाथानी (३३ धावा) यांनी उत्तम साथ दिली.
पुरस्कारांचा वर्षाव
- सामनावीर: रामकृष्णा राठोड (जामनेर सातपुडा हिरोज)
- बेस्ट सिक्स: रोहित तलरेजा आणि ललित पाटील.
- पारितोषिक: विजयी जामनेर संघाला १५,००० रुपये तर पाचोरा संघाला ८,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, अतुल जैन, अशोक जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच ‘स्पेक्ट्रम’च्या अलरीक इलेक्ट्रीक्स दालनाचे उद्घाटन व नवीन उत्पादनांचे अनावरणही करण्यात आले.

उद्याचे सामने (१९ एप्रिल):
१. दुपारी ३:०० वाजता: अमळनेर सुहास जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग्ज.
२. सायंकाळी: जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयल्स.
