जळगाव: जळगावकरांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या क्रिकेटचा उत्साह आता प्रत्यक्ष मैदानावर ओसंडून वाहणार आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित आणि ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लिग-२०२६’ (JCL T-20) चा थरार शनिवार, दि. १८ एप्रिलपासून सुरू होत आहे. मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस या भव्य क्रीडांगणावर हा क्रिकेटचा महा-उत्सव दि. २६ एप्रिलपर्यंत रंगणार आहे.

भव्य उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा शनिवारी सायंकाळी संपन्न होणार आहे. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, अनिल भाईदास पाटील, सुरेश भोळे आणि चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश आहे. तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि इतर पदाधिकारी या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
सहभागी संघ, आयकॉन खेळाडू आणि प्रशिक्षक
या स्पर्धेत एकूण ६ संघ, ६ प्रशिक्षक आणि १०८ कसलेले खेळाडू नशीब आजमावणार आहेत:

संघ संघ मालक आयकॉन खेळाडू प्रशिक्षक
जळगाव कोगटा किंग प्रेम, अतुल व प्रणव कोगटा जगदीश झोपे घनश्याम चौधरी
जामनेर सातपुडा हिरोज किरण बच्छाव शतायू कुलकर्णी मुस्ताक अली
पाचोरा एसकेटी योद्धाज हेमंत व प्रणव कोठारी सचिन चौधरी पंकज महाजन
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स सागर पार्क क्रिकेट क्लब ओम मुंडे सचिन सोनवणे
रावेर रॉयल्स महावीर जैन, विमल जैन, अखिल बनवट धवल हेमनानी तन्वीर अहमद
अमळनेर सुहास जायंट्स संदीप व श्रेयांस काबरा शुभम शर्मा राहुल निंभोरे

स्टेडियमला ‘मेट्रो सिटी’चा लूक
आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी जैन ड्रीम स्पेसेसचे मैदान विशेष रित्या सजवण्यात आले आहे.
मैदान: आंतरराष्ट्रीय दर्जाची टर्फ विकेट आणि हिरवळीचे सुसज्ज लॉन.
तंत्रज्ञान: बाऊंड्रीवर एलईडी स्क्रीन्स आणि डे-नाईट सामन्यांसाठी विशेष एलईडी लाईट्सची व्यवस्था.
प्रेक्षक गॅलरी: मुंबई-पुण्यातील स्टेडियमप्रमाणे प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी उभारण्यात आली असून ती सर्वांसाठी विनामूल्य खुली असेल.
स्पर्धेचे स्वरूप आणि वेळापत्रक
एकूण १९ सामने खेळवले जाणार असून प्रत्येक संघ साखळी फेरीत ५ सामने खेळेल. त्यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर आणि २६ एप्रिलला ‘ग्रँड फिनाले’ होईल.

प्रमुख सुरुवातीचे सामने:
१८ एप्रिल (सकाळी ८:३०): जामनेर सातपुडा हिरोज वि. पाचोरा एसकेटी योद्धाज.
१८ एप्रिल (सायं ७:३०): चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स वि. जळगाव कोगटा किंग.

१९ एप्रिल (दुपारी ३:००): अमळनेर सुहास जायंट्स वि. जळगाव कोगटा किंग.
बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी यांच्यासह अनुभवी पंचांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. जळगावमधील क्रिकेट प्रेमींनी या ‘महा-थराचा’ आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
