जळगाव | प्रतिनिधी
मेहरूण तलावाजवळील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर सध्या जळगाव क्रिकेट लीग (JCL T-20) चा थरार रंगत आहे. रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात जळगाव कोगटा किंग संघाने अमळनेर सुहांस जायंटसवर ३१ धावांनी मात करत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह ४ गुण मिळवून कोगटा किंगने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे ओम भोसले, ज्याने स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावून नवा विक्रम प्रस्थापित केला.

धावांचा पाऊस: ओम भोसलेची वादळी खेळी
नाणेफेक जिंकून अमळनेर सुहांस जायंटसचा कर्णधार शुभम शर्मा याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, जळगाव कोगटा किंगच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीवीर ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांनी पहिल्या ४ षटकांतच ४४ धावांची भागीदारी करत आक्रमक सुरुवात केली. गौरव ठाकूरने नाईकची विकेट घेत ही जोडी फोडली, पण त्यानंतर ओम भोसलेने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

ओमने अवघ्या ६५ चेंडूत १३० धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत १० उत्तुंग षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. त्याला अक्षय मेघानीने (३३ धावा) मोलाची साथ दिली. या जोरावर कोगटा किंगने २० षटकांत ५ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला.
अमळनेरची झुंज अपयशी

२२१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरुवात खराब झाली. मात्र, कर्णधार शुभम शर्मा याने ६८ धावांची (३९ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार) झुंजार खेळी करत एकाकी झुंज दिली. मध्यफळीत मानव टिभीरीवाला (३४ धावा) आणि रणजीत निकम (२५ धावा) यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली, परंतु वाढते धावगतीचे समीकरण गाठण्यात त्यांना अपयश आले.
अमळनेरचा संघ २० षटकांत ६ बाद १८९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कोगटा किंगकडून मनिष चौहानने ३ बळी घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार जगदीश झोपे आणि बिपीन चांगरे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

पुरस्कार आणि मान्यवरांची उपस्थिती
सामनावीर: ओम भोसले (सलग दुसऱ्यांदा)
डॉट बॉल पुरस्कार: राज बेलदार
याप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी, जैन इरिगेशनचे पंकज बऱ्हाटे, प्रेम कोगटा (दाल परिवार), राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल आणि नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सामन्याचे पंच म्हणून मंगेश नार्वेकर व संदीप गांर्गुेडे यांनी काम पाहिले, तर गुणलेखन मोहम्मद फजल यांनी केले.

जैन ड्रीम स्पेसेसवर तुफान गर्दी
JCL चे सामने पाहण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केली असून, स्थानिक खेळाडूंच्या या दर्जेदार खेळाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.