जळगाव शहरातील वीज समस्यांवर महत्त्वाची बैठक; त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश.

 

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील वाढत्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महापालिका विद्युत विभाग आणि महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत शहरातील विविध गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून संबंधित विभागांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, राहुल पाटील, गजानन मामा देशमुख यांच्यासह महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे तसेच महापालिका विद्युत विभाग प्रमुख मोरे साहेब आणि कनिष्ठ अभियंता सुमित पाटील उपस्थित होते.

शहरातील प्रमुख समस्यांवर चर्चा

बैठकीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. शहरात रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय अनेक भागांमध्ये स्ट्रीट लाईट रात्री बंद राहतात, तर दिवसा सुरू असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या केबल्स धोकादायक पद्धतीने लोंबकळत असून अनेक ट्रान्सफॉर्मरच्या पेट्यांवर झाकण नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी महावितरणचे वीज खांब रस्त्याच्या किंवा सर्व्हिस रोडच्या मध्यभागी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. तसेच नेमखेडी सबस्टेशन परिसरात वारंवार वीज समस्या निर्माण होत असून तेथील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची मागणी करण्यात आली.

नागरिकांनी वीज खंडित झाल्यानंतर सबस्टेशनमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास अनेकदा फोन लागत नसल्याची किंवा कर्मचारी फोन उचलत नसल्याची गंभीर बाबही लोकप्रतिनिधींनी मांडली.

अधिकाऱ्यांना कडक सूचना

शहरातील या सर्व समस्यांबाबत उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत विभागाला सर्व त्रुटींची तातडीने दखल घेऊन दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

नागरिकांना सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीज सेवा मिळावी यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. शहरातील वीज समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *