जळगाव (प्रतिनिधी):
शहरातील तांबापुरा भागातून चोरीला गेलेली मोटरसायकल शोधण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

नेमकी घटना काय?
तांबापुरा येथील रहिवासी अरुण सखाराम अहीरे (वय ३८) यांनी ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपली ‘हिरो होंडा स्प्लेंडर’ (क्र. MH-28 G 3256) घरासमोर लॉक करून उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना आपली गाडी गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून बी.एन.एस. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी साहील महोमद तडवी (वय २८, रा. मच्छीबजार, तांबापुरा) याला संशयावरून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच साहीलने गाडी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली आहे.
या पथकाने बजावली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक धनेक, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील, आणि राहुल घेटे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज घुले करत आहेत.
