जळगाव (प्रतिनिधी):
“शासकीय योजनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता ती प्रत्यक्षात तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहणे ही गंभीर बाब असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून हे हप्ते वितरित करावेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा खासदार स्मिताताई वाघ यांनी दिला.

जळगाव पंचायत समिती येथे आयोजित विविध शासकीय योजनांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी त्यांनी ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेतला.

प्रलंबित हप्त्यांबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी
बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार वाघ यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा आढावा घेतला. अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रशासकीय पातळीवर अडकले असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकांना हप्त्यांसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी विशेष मोहीम राबवून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.

महिला बचत गट ठरतील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी खासदार वाघ यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला. “बचत गटातील प्रत्येक महिला ही संभाव्य उद्योजक आहे. त्यांना केवळ कर्ज न देता प्रशिक्षण, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध करून द्या,” असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महिलांच्या उत्पादनांना स्थानिक मेळावे आणि प्रदर्शनांद्वारे हक्काची व्यासपीठे मिळवून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

विविध योजनांचा घेतला आढावा
बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभाग: प्रलंबित योजनांची अंमलबजावणी.
कृषी व सिंचन: सिंचन विहीर आणि गाय-गोठा अनुदान योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.
विकास निधी: सेस फंड आणि वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेली कामे विहित मुदतीत पूर्ण करणे.

महत्त्वाची उपस्थिती
या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, ॲडिशनल बी.डी.ओ. योगिता पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य राहील.”
— स्मिताताई वाघ, खासदार, जळगाव.
