मुक्ताईनगर (प्रतिनिधी): मुक्ताईनगर तालुक्यातील कोन्हाळा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गावालगतच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडुपात एक दिवसाचे जिवंत अर्भक फेकून दिल्याचे उघडकीस आले असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोन्हाळा गावातील एका शेताच्या बांधालगत काटेरी झुडुपात एक नवजात अर्भक असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. कोन्हाळा गावाच्या पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती तातडीने कुन्हा दूरक्षेत्र पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस हवालदार अशोक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव आणि श्रावण भिल्ल यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या चिमुकल्या जीवाची काटेरी झुडुपातून सुटका केली.

अर्भकाची प्रकृती चिंताजनक
पोलिसांनी तातडीने अर्भकाला कुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, अर्भकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या या अर्भकावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

अंगावर काटे, जखमांचे ओरखडे… दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावले
घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहोचले, तेव्हा हे दृश्य अत्यंत भयावह होते. सदर अर्भक हे स्त्री जातीचे असून त्याची वाढ अपूर्ण झालेली आहे. झुडुपात फेकल्यामुळे अर्भकाच्या अंगावर सर्वत्र काटे रुतले होते आणि शरीरावर गंभीर जखमा व ओरखडे उमटले होते. अशक्तपणामुळे त्या अर्भकाला रडताही येत नव्हते. हे विदारक दृश्य पाहून उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

जादूटोण्याचा संशय?
प्राथमिक अंदाजानुसार हे अर्भक सुमारे सात महिन्यांचे असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गर्भपात करून अर्भकाला जिवंत फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अर्भकाच्या ओठांवर आणि डोक्यावर त्रिकोणी स्वरूपाच्या जखमा आढळल्याने यामागे काही जादूटोण्याचा प्रकार तर नाही ना? असा संशयही परिसरात व्यक्त केला जात आहे.

अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या अमानुष घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या निर्दयी पालकांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.