जळगाव (प्रतिनिधी): जमिनीच्या खरेदी खताची नोंद घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या करंज (ता. जळगाव) येथील तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दणका दिला आहे. तलाठी अजय बिडवे असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावे सजा करंज हद्दीत शेती खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या जमिनीची शासकीय दप्तरी रीतसर ‘खरेदी नोंद’ लावण्यासाठी तक्रारदार तलाठी अजय बिडवे यांना भेटले. मात्र, हे कायदेशीर काम करण्यासाठी बिडवे यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. हक्काच्या कामासाठी पैसे मागितले गेल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे धाव घेत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार नोंदवली.

एसीबीचा सापळा आणि कारवाई
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी तलाठी बिडवे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारताना बिडवे यांना संशय आल्याने त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. पैसे स्वीकारले नसले तरी, ‘लाचेची मागणी’ सिद्ध झाल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

महत्त्वाची नोंद: लाच प्रत्यक्ष स्वीकारली नसली तरी, लाचेची मागणी करणे हा देखील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरतो. याच आधारावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, संगिता पवार, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आणि प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.