जळगाव: जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी ठरणारी ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ प्रायोजित आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ (JCL T-20, पर्व-२) चा बिगुल वाजला आहे. जैन हिल्स येथील ‘परिश्रम’ हॉलमध्ये पार पडलेल्या भव्य ऑक्शनमध्ये संघांच्या मालकी हक्कासाठी आणि आयकॉन खेळाडूंसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली.

जळगाव किंग्सची हवा; दाल परिवाराकडे मालकी
या लिलावात सर्वाधिक आकर्षण ठरले ते ‘जळगाव किंग्स’ या संघाचे. या संघाची फ्रँचायझी मिळवण्यासाठी अनेक उद्योजकांमध्ये स्पर्धा होती, मात्र अखेर दाल परिवार (प्रेम कोगटा व अतुल कोगटा) यांनी ही फ्रँचायझी आपल्या नावे केली.
ओम मुंडे ठरला ‘लिलावाचा राजा’
आयकॉन खेळाडूंच्या बोलीमध्ये ओम मुंडे याने बाजी मारली. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या ‘चाळीसगाव चार्जर्स’ संघाने मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तो या पर्वातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

लीगमध्ये सहभागी होणारे ६ संघ आणि त्यांचे शिलेदार
लिलावानंतर निश्चित झालेली संघांची अधिकृत माहिती खालीलप्रमाणे आहे:
संघ फ्रँचायझी मालक प्रशिक्षक आयकॉन खेळाडू
जळगाव किंग्स दाल परिवार (प्रेम व अतुल कोगटा) घनश्याम चौधरी जगदीश झोपे
चाळीसगाव चार्जर्स सागर पार्क क्रिकेट क्लब सचिन सोनवणे ओम मुंडे
रावेर रॉयल्स सीए महावीर जैन तनवीर अहमद नचिकेत ठाकूर
अमळनेर जायंट्स सुहांस केमिकल्स (संदीप काबरा) राहुल निंभोरे शुभम शर्मा
पाचोरा टायटन्स एस.के. ट्रान्सलाइन (हेमंत कोठारी) पंकज महाजन सचिन चौधरी
जामनेर ब्लास्टर्स रमेशदादा जैन मुश्ताक अली.

स्थानिक खेळाडूंना मिळणार मोठी संधी
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले की, “या लीगमुळे जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.” यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहभागी संघ मालकांचा सुतीहाराने यथोचित सन्मान करण्यात आला. लिलाव प्रक्रियेचे सूत्रसंचालन अॅड. सूरज जहांगिर यांनी केले, तर अरविंद देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मुख्य पंच संदीप गांगुर्डे व हितेश पटेल यांनी लिलाव प्रक्रिया पार पाडण्यास सहकार्य केले.