जळगाव (प्रतिनिधी):
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, उद्या (दि. २४ मार्च) होणाऱ्या या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यंदा जळगावच्या वकिली क्षेत्रासाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. जळगाव न्यायालयातून पहिल्यांदाच एक महिला वकील, ॲड. रेखा घनश्याम कोचुरे, यांनी बार कौन्सिलच्या रिंगणात उतरून इतिहास रचला आहे.

दोन उमेदवार मैदानात; प्रतिष्ठेची लढत
जळगाव शहरातून यंदा दोन दिग्गज उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अनुभवी ॲड. गुलाबसिंग मानसिंग पाटील आणि ॲड. रेखा घनश्याम कोचुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, दोघेही विजयासाठी जोमाने प्रचारात उतरले आहेत. यापूर्वी जळगावचे प्रतिनिधित्व ॲड. एल. एल. बेंडाळे आणि ॲड. भरत देशमुख यांसारख्या नामवंत वकिलांनी केले आहे. मात्र, जळगाव न्यायालयाच्या इतिहासात यापूर्वी कधीही महिला उमेदवाराने बार कौन्सिलच्या निवडणुकीत दावेदारी ठोकली नव्हती. ही परंपरा ॲड. रेखा कोचुरे यांनी मोडीत काढली आहे.

महिला आरक्षणाचा फायदा?
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या एकूण २३ सदस्यांच्या निवडीसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, निवडणूक प्रक्रियेनंतर २ महिला को-ऑप्ट मेंबर्सची निवड केली जाणार असून, कौन्सिलची एकूण सदस्यसंख्या २५ होणार आहे. ॲड. रेखा कोचुरे या जळगावातून पहिल्या महिला उमेदवार असल्याने त्यांना महिला वकिलांसह युवा वकिलांचाही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

खानदेशासाठी ऐतिहासिक क्षण
जर ॲड. रेखा कोचुरे या निवडणुकीत विजयी झाल्या, तर खानदेशातून (जळगाव, धुळे, नंदुरबार) बार कौन्सिलवर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या महिला सदस्य ठरतील. यामुळे केवळ जळगावचेच नव्हे, तर संपूर्ण खानदेशाचे नाव राज्याच्या कायदेशीर वर्तुळात आदराने घेतले जाईल.

वकील समुदायाचे लक्ष मतदानाकडे
उद्या दिनांक २४ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्हा न्यायालयातील वकील कोणाला पसंती देतात आणि ॲड. रेखा कोचुरे यांच्या रूपाने नवा इतिहास घडतो का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. जिल्हयातील वकिलांमध्ये या निवडणुकीबाबत कमालीचा उत्साह दिसून येत असून, ही निवडणूक जळगावच्या वकिली क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, अशी चर्चा आहे.
