जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. नारद गावाजवळून वाहणाऱ्या गुळ नदीच्या पात्रात एका २२ ते २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. तरुणाच्या अंगावर आणि डोक्यावर गंभीर जखमा असल्याने परिसरात घातपाताची चर्चा सुरू झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास उन्हाचा पारा कमी झाल्यावर काही स्थानिक ग्रामस्थ गुळ नदीच्या पात्राजवळ फिरण्यासाठी गेले होते. यावेळी केटीव्हीआर बंधाऱ्याजवळ त्यांना एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. हे भीषण दृश्य पाहून गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जळगाव ग्रामीण पोलीस दलाचे डीवायएसपी, अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

घातपाताचा दाट संशय
मृत तरुणाच्या डोक्यावर आणि शरीरावर असलेल्या खोल जखमा पाहता, त्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकून दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, “तरुणाच्या शरीरावरील जखमा गंभीर आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि तपासाला दिशा मिळेल.”

सध्या पोलीस या तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत असून, परिसरात गेल्या काही दिवसांत कोणी बेपत्ता झाले आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे चोपडा परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.