जळगाव : वाढत्या उन्हाच्या झळा केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या पक्ष्यांनाही सोसाव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘जागतिक चिमणी दिवसा’चे औचित्य साधून शहरातील काव्यरत्नावली चौकात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पक्ष्यांसाठी ४०० परळ (पाणी ठेवण्याची भांडी) वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

‘पाणी ठेवा, चिमण्या वाचवा’ असा दिला संदेश
वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांना पाण्याची मोठी कमतरता भासते. हे ओळखून नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणात हे परळ ठेवून पक्ष्यांची तहान भागवावी, असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. या उपक्रमाला जळगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सामूहिक प्रयत्नांची गरज : आ. सुरेश भोळे
यावेळी उपस्थित असलेले आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतात चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी चिमण्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असून, त्यासाठी अशा सामूहिक सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, ग्रीन सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील, नगरसेवक नितीन बरडे, डॉ. विनोद बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच वंदना मंडावरे, आशा मौर्य, रेणुका हिंगू, माधुरी शिंपी, हर्षा गुजराथी, नेहा जगताप, राधिका पाटील, स्मिता पाटील, पुजा हिंगू, पुर्वी शाह, जानवी जगताप, गौरव वनरा, किशोर पाटील यांसह संस्थेचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा जागर करत, भविष्यातही असे लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे