पारनेर (प्रतिनिधी)
समाजात आध्यात्मिक प्रबोधन करणाऱ्या एका कीर्तनकारानेच नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासल्याचा संतापजनक प्रकार पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात उघडकीस आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
आरोपी अण्णासाहेब गुंजाळ हा पीडित मुलीचा शेजारी असून, त्याच्या वारकरी शिक्षण संस्थेत पीडितेचा भाऊ सचिव म्हणून कार्यरत आहे. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने गेल्या पाच वर्षांपासून पीडितेवर बळजबरीने अत्याचार केले. या कृत्याला विरोध केल्यास पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती, ज्यामुळे पीडिता आणि तिचे कुटुंब दहशतीखाली होते.

लोखंडी पक्कडीने दिले चटके
या प्रकरणातील क्रूरता १० मार्च २०२६ रोजी समोर आली. आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या घरी बोलावले आणि तिथे तिला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन गंभीर इजा केली. या अमानुष कृत्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून घडलेला प्रकार समोर आणला.

पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीवरून पारनेर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
न्यायालयाने आरोपीला २० मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, अशा नराधमाला कठोर शासन व्हावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.