सुप्रीम कॉलनी परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष; सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रारंभ
जळगाव:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन आज जळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन वर्धापन दिन साजरा केला.

याच घटनेचे औचित्य साधून जळगावमधील औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम कॉलनी (पोलीस कॉलनी) येथील मनसे शाखेत जल्लोषात कार्यक्रम पार पडला.
फटाक्यांच्या आवाजात आणि पेढ्यांच्या गोडव्यात साजरा झाला उत्सव
सुप्रीम कॉलनी परिसरातील शाखेमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत फटाके फोडले आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पक्षाच्या दोन दशकांच्या प्रवासाचा अभिमान व्यक्त करत कार्यकर्त्यांनी ‘राज ठाकरे साहेब झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

उद्यापासून सदस्य नोंदणीचा धडाका
वर्धापन दिनानिमित्त या शाखेत उद्यापासून विशेष ‘सदस्य नोंदणी’ मोहिमेला सुरुवात होणार आहे. शाखाध्यक्ष युसुफ खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेतील सर्व पदाधिकारी ही मोहीम राबवतील. या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण जळगाव शहर आणि जिल्ह्यात मनसेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही नोंदणी मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

नागरिकांना सहभागाचे आवाहन
यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहरातील माता-भगिनी आणि सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याप्रसंगी उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक, अशपाक शहा, बादशाहा शहा, दीपक माळी, मुज्जू बिस्ती, अली खाटीक, सोहेल पिंजारी, शोएब खाटीक, प्रदीप गायकवाड यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
