जळगाव | प्रतिनिधी: धाडस महाराष्ट्र न्यूज.
जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कॉलनी परिसरात मतदान प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त करत. आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक प्रशासनाकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे.

मनसेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील निवडणुकांच्या अनुभवावरून सुप्रीम कॉलनी परिसरात मतदानाच्या दिवशी बाहेरगावाहून नागरिक येऊन मतदान करत असल्याचे प्रकार घडले आहेत. यंदाही उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी काही नागरिक दुसऱ्या गावांतून आले असल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

सदर नागरिक जळगावपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर असलेल्या पहूर, फर्दापूर व अजंठा या भागांमध्ये थांबलेले असल्याची माहिती मनसेने प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे आधार कार्ड तपासण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आधार कार्डवरील पत्ता जळगाव शहराबाहेरील असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी मनसेने केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही लेखी पत्र देण्यात आल्याचे मनसेने नमूद केले आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भयपणे पार पडावी, तसेच स्थानिक मतदारांच्या हक्कांवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यक्त केली आहे.
उपरोक्त निवेदन उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,विभाग अध्यक्ष उमेश ठाकरेविभाग अध्यक्ष विशाल जाधव यांनी दिले आहे.
