जळगाव (प्रतिनिधी): “कायदा सर्वांसाठी समान असतो” हे लोकशाहीचे मूलभूत तत्व आहे. मात्र, जळगावमध्ये एका जबाबदार न्यायमूर्तींच्या वाहनानेच भरचौकात ट्रॅफिक सिग्नल ओलांडून नियमांना केराची टोपली दाखवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे “नियम केवळ सामान्य जनतेसाठीच आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत तक्रार धाडण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ ते ६:१५ च्या सुमारास जळगाव येथील वर्दळीच्या कोर्ट चौकात हा प्रकार घडला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश (PDJ) शेख साहेब यांचे शासकीय वाहन (क्रमांक: MH19EG0454) सिग्नल लाल असतानाही तो तोडून पुढे निघून गेले. विशेष म्हणजे, ज्या न्यायदान व्यवस्थेकडून नियमांच्या पालनाची अपेक्षा केली जाते, त्याच व्यवस्थेतील सर्वोच्च स्थानिक पदावरील व्यक्ती स्वतः वाहनात उपस्थित असताना हा प्रकार घडला.

सामाजिक कार्यकर्त्याचा ‘ऑन द स्पॉट’ जाब
शहरातील सजग नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार पी. गुप्ता यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता या वाहनाचा मागोमाग पाठलाग केला. ‘स्वतंत्रता चौकात’ वाहतूक कोंडीमुळे गाडी थांबली असता, दीपककुमार गुप्ता यांनी गाडीजवळ जाऊन काच ठोठावली. त्यांनी गाडीतील अंगरक्षक (RTPC) यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, “साहेबांच्या गाडीने अशा प्रकारे सिग्नल तोडणे हे कायद्याला धरून नाही, त्यांनी नियमांचा आदर राखला पाहिजे.” मात्र, यावर वाहनातील चालक किंवा अंगरक्षकाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि सिग्नल सुटताच वाहन पुढे निघून गेले.

उच्च न्यायालय आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार
या गंभीर घटनेची दखल घेत दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने ईमेलद्वारे मुख्य न्यायमूर्ती (मुंबई उच्च न्यायालय), निबंधक (मुंबई उच्च न्यायालय), जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहर वाहतूक शाखेला लेखी तक्रार सादर केली आहे.
तक्रारीतील प्रमुख मागण्या:
१. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.
२. संबंधित वाहन आणि दोषींवर मोटार वाहन अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई व्हावी.
३. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देण्यात यावेत.

कायद्याचा आदर की पदाचा?
या घटनेमुळे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सामान्य नागरिकाने सिग्नल तोडला तर पोलीस तात्काळ दंड आकारतात, मग त्याच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. कायद्याचा रक्षकच जर भक्षक झाला, तर सामान्य माणसाने कोणाकडे आदर्श म्हणून पाहायचे, यावर आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“न्यायदान व्यवस्थेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असे कृत्य होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून दोषींवर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे.” > — दीपककुमार पी. गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता, जळगाव.
