जळगाव: राज्यात सत्ताधारी बाकावर एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. जळगाव महानगरपालिकेतील कंत्राटाच्या वादातून शनिवारी दुपारी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते चक्क पोलीस ठाण्यातच एकमेकांना भिडले. या राड्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

वादाचे नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेच्या एका कंत्राटावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. शनिवारी दुपारी जळगावच्या बालाजी पेठ परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली.

पोलीस ठाण्यातच रणकंदन
दुपारच्या राड्यानंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलीस ठाण्याच्या आवारातच पुन्हा वाद उफाळून आला. भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिवसेना शिंदे गटाचे राहुल ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलीस ठाण्याच्या आतच दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली.

लाठीमार आणि तणाव
या भीषण हाणामारीत भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
परस्परविरोधी गुन्हे दाखल
या घटनेनंतर शनिपेठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सत्ताधारी पक्षांमधील या ‘गॅंगवॉर’मुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
