जळगाव- जिल्ह्यात अद्यापही ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर (AVTS) उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील हजारो व्यावसायिक वाहनचालक व वाहनमालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फिटनेस चाचणीसाठी तब्बल १५० ते २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक येथे जाण्याची सक्ती होत असल्याने हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा, तसेच नवीन केंद्र सुरू होईपर्यंत पूर्वीच्या पद्धतीने वाहन फिटनेस चाचणी सुरू ठेवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनच्या संयुक्त सहकार्याने आज प्रादेशिक परिवहन कार्यालय,

जळगाव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाहिद अली, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी यांच्यासह संदीप मांडोळे, दीपक राठोड, असत पठाण, सिताराम पुरोहित, धनराज पुरोहित, मुकुंद चौधरी, शरद चव्हाण व मोठ्या संख्येने वाहनचालक व वाहनमालक उपस्थित होते.

२५० किमी प्रवासाची सक्ती अन्यायकारक
जळगाव जिल्ह्यात ऑटोमेटेड फिटनेस सेंटर नसल्याने व्यावसायिक वाहनधारकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी नाशिक (सुमारे २५० किमी) किंवा छत्रपती संभाजीनगर (सुमारे १५० किमी) येथे जावे लागत आहे. या प्रवासामुळे इंधन खर्च, टोल नाके, वाहनाची झीज, चालक व सहचालकाची रोजंदारी तसेच वाहन एक ते दोन दिवस व्यवसायातून बाहेर राहिल्याने होणारे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एकाच वाहनावर उदरनिर्वाह करणाऱ्या लहान वाहनधारकांसाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण ठरत आहे.

वेळेवर फिटनेस प्रमाणपत्र न मिळाल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंड, वाहन जप्ती, विमा व इतर शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होतात. मात्र जिल्ह्यात सुविधा उपलब्ध नसताना वाहनधारकांवर कारवाई होणे हे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
मोटार वाहन कायदा सुरक्षितता व सुलभ सेवा देण्यासाठी असताना, आवश्यक पायाभूत सुविधा नसल्यामुळे वाहनधारकांवर अप्रत्यक्ष आर्थिक भुर्दंड व मानसिक ताण येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या मागण्यांसाठी आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
“आम्ही फिटनेससाठी नाशिक किंवा संभाजीनगरला जाणार नाही”,
“जळगावला फिटनेस सेंटर द्या”,
“पूर्वीची फिटनेस पद्धत सुरू ठेवा”
अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
जळगावसारख्या औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात अद्याप ऑटोमेटेड फिटनेस सेंटर सुरू न होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, अधिकृत AVTS कार्यान्वित होईपर्यंत पारंपरिक / मॅन्युअल पद्धतीने फिटनेस चाचणी सुरू ठेवावी किंवा किमान संक्रमण कालावधी जाहीर करावा, अशी ठाम मागणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा..
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. हा लढा केवळ संघटनांचा नसून जळगाव जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाहनचालक व वाहनमालकांचा असल्याचे आंदोलकांनी ठामपणे सांगितले.
