गरिबीचे चटके सोसत यशोशिखर गाठण्याचा प्रवास म्हणजे ‘ भटकन ‘
शेतात काम करत असतांना उन्हाच्या झळा सोसतांना ज्याच्या पायात कधी नीट चप्पल नव्हती आज त्याच्या शब्दांनी अनेकांचे आयुष्य सावरलं जात आहे. भटकन ही केवळ एका मुलाची गोष्ट नाही तर ती गरिबीच्या काट्यांवरून चालत ज्ञानाच्या सिंहासनापर्यंत पोहोचलेल्या एका जिद्दी व्यक्तीचे महाकाव्य आहे. चांभार समाजातील एका चिमुरड्याने रखरखत्या उन्हात पाहिलेले स्वप्न जेव्हा सत्यात उतरते तेव्हा समाज व्यवस्थेच्या मर्यादा गळून पडतात आणि माणुसकीचा विजय होतो. हाच या कादंबरीचा मूळ आशय आहे असे म्हणायला हरकत नाही.

लेखक रवींद्र सोनवणे यांनी लिहिलेली भटकन कादंबरी मी नुकतीच वाचली पहिल्याच प्रकरणामध्ये चिमूरड्या रवीन याने शेतात माळी (आई ) सोबत राबणाऱ्या मोल मजुरी करणाऱ्या कामगारांसाठी अनवाणी पायाने रखरखत्या उन्हात पाजलेल्या पाण्यातून माणुसकीचा धडा मिळतो. फाटलेल्या शर्ट पासून बनवलेल्या वाहना ही कल्पनाच आजच्या काळात असह्य वाटते. परंतु पायात नव्हती वाहन पण उराशी आभाळ होते दारिद्र्याच्या चिखलातही त्याचं मन अगदी निर्मळ होतं हीच जाणीव ही कादंबरी आपल्याला करून देते.

घरातील अठरा विश्व दारिद्र्य निर्मूलनासाठी गावातल्या चिंचेच्या पारावर रखरखत्या उन्हात ज्याचे हात चामड्याशी झुजत होते नशिबाचे टाके घालतांना त्याचे डोळे मात्र स्वप्न गुंफत होते याची जाणीव होते. चांभार वाड्यातील नाकाला झोंबणाऱ्या मसाला युक्त पाण्यामध्ये पडलेली ही शक्कर भेली म्हणजे लेखक चिंधाबा आजोबांच्या सहवासात अधिकच गोड होत जाते. पंढऱ्या काकाच्या लग्नाला नवीन कपडे मागताना मार खाणारा हा चिमुरडा त्याच काकांनी घेतलेल्या सायकलवरून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो.
सरिता बाई सारख्या शिक्षिका शाळेत न आल्याने हुरहुर लागणाऱ्या या मुलाला दुसऱ्या शिक्षकांच्या जातीय भेदाला बळी पडावं लागतं ही त्या काळातली वास्तवता मांडताना , तसेच बामनाला ( ब्राम्हणाला) देण्यासाठी पैसा नाही म्हणून एका शिक्षकांच्या मदतीने मंगलाष्टक म्हणून घेणाऱ्या समाजाची अगतिकता लेखक निसंकोच आपणापुढे मांडतो.
गरिबीने इतके पोळावे की अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन उपचाराअभावी बहिण गमवाव्या लागलेल्या भावाच्या असह्य वेदना वाचतांना मन विषिन्न होतं. बहिणीच्या लग्नासाठी भुरी या लाडक्या बकरीलाला विकतांना तसेच मावशीने राबवून घेऊन पैसे न देता हाकलून दिलेल्या या बाल मनाच्या भावना तावडी आणि अहिराणी अशा एकत्रित भाषेमधून मांडण्याची लेखकाची शैली काही वेगळीच आहे.

गरीबीशी झुंज देतांना हाताला मिळेल ते काम करत प्रसंगी विहीर खोदण्याचे, वेटरचे असेल, कंपनीत रासायनिक पाण्याची टाकी साफ करणे, सोनखत ट्रॉली भरणे, मेलेल्या प्राण्यांची चामडी काढणे, गवंडी काम, आणि कॉलेजमध्ये कमवा शिकवा योजनेचे काम करून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याची उराशी जाण ठेवणारया रवींद्रची ही भटकंती म्हणजे एकट्याचा प्रवास नसून अनेकांची सोबत होती.
बीएड करण्यासाठी त्याला मिळालेली अनेकांची साथ म्हणजे जणू वाळवंटातली सावली. मित्रांच्या खांद्यावर चढून यशाची नवीन वाट त्याला पावली आणि म्हणूनच पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाची शस्त्र त्याने धारदार केली. अज्ञानाच्या अंधकाराला आज नवीन सकाळ त्याने दाखवली. जो कालपर्यंत वाहन शिवत होता तो आज नशिबं शिवतोय ,एक आदर्श शिक्षक होऊन तो भविष्याच्या पिढ्या घडवतोय त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
तुटलेल्या वाटांवरून चालतांना जो कधीच थकला नाही, ज्याला परिस्थितीच्या वादळाने कधीच रोखलं नाही अशी ही भटकन यशाच्या शिखरावर आज विसावली आहे आणि त्यातून एका गरीबाच्या लेकाने आज माणुसकीची उंची गाठली आहे.
मित्रांनो भटकन ही कादंबरी म्हणजे प्रतिकूलतेवर मात करण्याचे दुसरे नाव आहे ज्यांच्या हातांनी चामडं शिवलं, तेच हात जेव्हा खडू आणि डस्टर हातात घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती घडते. भटकन हा त्या क्रांतीचाच एक शब्दरूपी प्रवास आहे. या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने मी लेखकाला अनेक अनेक शुभेच्छा देतो त्यांचे भावी आयुष्य असंच यशस्वी होत राहो या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक: लेखक कवी प्रा.मिलिंद चिंधु बडगुजर
